नवी दिल्ली : “लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी राजकारणासाठी परराष्ट्र धोरणसंदर्भात खोटे दावे करतात. मात्र, त्यांच्या या दाव्यांमुळे परदेशात भारताची प्रतिमा मलीन होते”; असे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सुनावले आहे.
संसदेत राष्ट्रपती अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेस प्रारंभ झाला. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणावर टिका करताना केंद्र सरकारची मेक इन इंडिया ही योजना अपयशी ठरल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे भारतात उत्पादन क्षेत्राचा विकास खुंटला असून परिणामी चीनला त्याचा लाभ होत असल्याचाही आरोप केला. अमेरिकी राष्ट्रपता डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपधविधी सोहळ्याविषयीदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली.
विरोधी पक्षनेते गांधी यांच्या टिकेस परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डिसेंबर २०२४ मध्ये आपल्या अमेरिका भेटीबद्दल जाणूनबुजून खोटे बोलले आहेत. आपण बायडेन प्रशासनाचे परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना भेटण्यास गेलो होतो. यावेळी भारताच्या महावाणिज्यदूतांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भुषविण्यासोबतच अमेरिकेच्या नवनियुक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचीही भेट घेतली होती.
यावेळी पंतप्रधानांना देण्यात आलेल्या निमंत्रणावर कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नाही. भारताचे पंतप्रधान अशा कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत. अशा प्रसंगी भारताचे प्रतिनिधित्व सहसा विशेष दूत करतात. राहुल गांधींच्या खोट्या बोलण्यामागे राजकीय हेतू असू शकतो, पण त्यामुळे परदेशात देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान अचानक वाढल्याचा जुनाच दावा नव्याने केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या या आरोपांना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील तीव्र आक्षेप घेतला. देशाच्या संवेदनशील मुद्द्यांविषयी राहुल गांधी यांनी आता तरी जबाबदारीने बोलावे, असा सल्लाही रिजिजू यांनी यावेळी दिला.