---Advertisement---
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओ हे विश्वासाचे दुसरे नाव आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या शस्त्रास्त्र प्रणालींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान निर्णायक भूमिका पार पाडली, असे कौतुक संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी केले.
‘ऑपरेशन सिंदूर वेळी डीआरडीओच्या उपकरणांनी कोणत्याही अडथळ्यांविना काम केले. या उपकरणांनी केवळ लष्करी मोहिमांचे यश सुनिश्चित केले नाही, तर जवानांचे मनोबल उंचावण्याचे काम केले. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सज्ज असलेला भारतीय सशस्त्र दल पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात सक्षम आणि आत्मनिर्भर आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
हवाई संरक्षण यंत्रणा ‘सुदर्शन चक्र’ची निर्मिती केली जात असून, डीआरडीओ त्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सुदर्शन चक्राबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ मधील स्वातंत्र्य दिनाला घोषणा केली होती. या अंतर्गत पुढच्या दशकात महत्त्वपूर्णम संस्था आणि ठिकाणांना बळकट हवाई संरक्षण यंत्रणेचे कवच लाभणार आहे. आधुनिक युद्धात हवाई संरक्षण यंत्रणा अत्यंत महत्त्वपूर्ण असते, हे ‘ऑपरेशन सिंदूर मध्ये स्पष्ट झाले. डीआरडीओ केवळ तंत्रज्ञानाचा निर्माता नाही, ही एक विश्वास निर्माण करणारी संघटना आहे, असे राजनाथसिंह यांनी संबोधित करताना सांगितले.









