मुंबई: काल रात्री 332 नंबरची बेस्ट इलेक्ट्रिक बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या कुर्ल्यामध्ये ही भरधाव बस वेगाने घुसली. यावेळी वेगात आलेल्या बसने 40 वाहनांना धडक देत अनेकांना चिरडले. याच 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
कसा झाला अपघात?
सोमवारी रात्री 9.50 च्या सुमारास बेस्टची 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती. भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर बेस्ट बसनं पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना चिरडलं बसने 30-40 गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे फूटपाथवरील तसेच गाडीत बसलेले काही लोकही जखमी झाले.अनेकांना चिरडल्यानंतर अखेर ही इलेक्ट्रॉनिक बस एका इमारतीला धडकून थांबली. मिळालेल्या माहितीनुसार बसचालक संजय मोरे हा कंत्राटदाराद्वारे नेमण्यात आला आहे. 9 दिवसांपूर्वीची त्याची नियुक्ती करण्यात आली होती.
मद्यधुंद ड्रायव्हर की ब्रेक फेल?
हा भीषण अपघात कशामुळे झाला हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे. ज्या बसचा अपघात झाला त्याचा ड्रायव्हर मद्यधुंद होता की बसचे ब्रेक फेल झाले होते ? त्याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांच्या मते ड्रयव्हर हा मद्यधुंद होता. तर पोलिसांनी अटक केलेल्या ड्रायव्हरची चौकशी केली असता, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. बसचा स्पीड अचानक वाढला आणि ब्रेक फेल झाला. त्यामुळे अपघात घडल्याचे ड्रायव्हरचे म्हणणे आहे.
ड्रायव्हरला मोठी बस चालवण्याचा अनुभव होता का?
दरम्यान या अपघातासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत मानली जात आहे. ती म्हणजे चालक संजय मोरे याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा नसलेला अनुभव. मिळालेल्या माहितीनुसार संजय मोरे हा कोरोना काळापासून बेस्टमध्ये कंत्राटी तत्त्वावर कामाला होता. याआधी तो बेस्टच्या लहान आकाराच्या जुन्या बस चालवायचा. 1 डिसेंबरपासून त्याला फक्त दहा दिवस ही बस चालवण्याचे ट्रेनिंगही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फक्त 10 दिवसांचं प्रशिक्षण देऊन संजय मोरेला पॉवर स्टेअरिंग असणारी इलेक्ट्रिक बस चालवायला देणे योग्य होते का, असा सवाल आता विचारला जात आहे.