वरणगाव परिसरात एक धक्कदायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरपासून जवळ असलेल्या सुसरी वेल्हाळे मार्गादरम्यानच्या वेल्हाळे शिवारातील विटभट्ट्यांवर हि घटना घडली आहे. शनिवारी २२ मार्च रोजी रात्री घडलेली हि घटना रविवारी २३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली .
हेही वाचा : निर्दयीपणे मारहाण अन् अंगावर मारल्या उड्या; तृतीयपंथीयांकडून तरुणाची हत्या, व्हिडिओ व्हायरल
वरणगाव आणि परिसरातील सुसरी वेल्हाळे मार्गाजवळ अनेक विट भट्टे आहेत. या भट्ट्यांवर इतर जिल्ह्यातील मजूर कामाला आहेत. दरम्यान,या वीटभट्टीवर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर कुटुंबासह कामाला असून याच ठिकाणी ते वास्तव्यास होते. तर त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेख हे देखील चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते.
मात्र, जावई अजीज शेखला दारूचे व्यसन असून तो नेहमी दारू पिऊन पत्नी सनासोबत भांडण करत होता. शनिवारी २२ मार्च रोजी देखील नेहमीप्रमाणे जावई अजीज शेखने दारू पिऊन पत्नी सनासोबत भांडण केले. दोघात भांडण इतके विकोपाला गेले कि अजीजने पत्नी सना हिचा गळा आवळून हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत सना शेखचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. आरोपी अजीज शेख घटनेनंतर फरार झाला आहे.