तरुण भारत लाईव्ह । डॉ. अरुणा धाडे । ‘मंदिरं’ या साप्ताहिक सदरात आतापर्यंत मी ज्या मंदिरांबद्दल लिहिलंय ती सगळी मंदिरं ही देश-विदेशातील ‘प्राचीन मंदिरं’ होती. प्रत्येक मंदिराला त्याचा एक इतिहास होता. काही इतकी जुनी होती की साक्षात देवाधिदेवांच्या आख्यायिकांमध्ये त्यांचा उल्लेख होता पण आजच्या लेखातील मंदिर हे पुरातन नसून अगदी अलिकडच्या काळातील आहे. नवं कोरं आहे. गेल्या वर्षी (2022) दसर्याच्या शुभमुहूर्तावर हे देवालय भक्तांसाठी खुले करण्यात आले. ते मंदिरं आहे दुबईचे ‘हिंदू मंदिर’.
भारतात ‘हिंदू मंदिर’ असं एखाद्या मंदिराचं नाव ऐकताना थोडं वेगळं वाटू शकतं, पण दुबईसारख्या देशात जिथे जगभरातील विविध धर्मांचे, विविध पंथाचे, विविध संस्कृतीचे असंख्य लोकं कामानिमित्त वास्तव्यास असतात तिथे ‘सनातन हिंदूधर्मीय लोकांच्या आस्थेचे स्थान ते ‘हिंदू मंदिर’ असं पटकन आकलन होतं; म्हणून हे नाव अगदी संयुक्तिक वाटतं. शिव मंदिर, कृष्ण मंदिर, देवी मंदिर अशा देवीदेवतांच्या नावाऐवजी प्रत्येक हिंदू आपापल्या आस्थेनुसार ज्या देवीदेवताना सर्वोच्च शक्ती म्हणून पुजतो त्या सकल हिंदू धर्माच्या नावाने मंदिरं संबोधलं जावं, जेणेकरून एकाच ठिकाणी सगळ्यांची श्रद्धा सम्मिलीत व्हावी, असा मंदिर व्यवस्थापन कमिटीने एकमताने निर्णय घेतला आणि मंदिराचं नामकरण ‘हिंदू मंदिरं’ झालं.
आतापर्यंत देशातील देशाबाहेरील बर्याच मंदिरांना भेटी दिल्या होत्या. या यादीत एक नवीन मंदिरं जुळलं होतं. त्यामुळे मंदिराला भेट देण्याची आतुरता लागून होती. लवकरच दुबईला जाण्याचा बेत आखला आणि मंदिर दर्शनाचा सुंदर योग जुळून आला.
दुबई मेट्रोच्या ‘इब्न बटुटा’ स्टेशनमधून बाहेर पडून काही अंतर पायी गेल्यावर दुरूनच मंदिराचा काही भाग दिसू लागतो (इथे ‘कळस’ शब्द वापरला नाहीये कारण मंदिराची बांधणी ही अरेबिक आर्किटेक आणि पारंपरिक मंदिर बांधणी पद्धतीने केली गेली आहे.) मंदिराकडे जाणार्या रस्त्यातच पगडीधारी सरदार मंडळी दिसू लागतात. तोच नव्याने बांधलेला गुरुद्वारा समोर दिसतो. त्याला वळसा घालून पुढे जाताच शुभ्र पांढर्या रंगाचे भव्य मंदिर दृष्टीस पडतं. विस्तीर्ण, बेरंग वाळवंटात सहस्त्र शुभ्र जलधारांनी उत्स्फूर्तपणे सुमधुर संगीतावर थुईथुई नर्तन सुरू करावं, अशी सुंदर आनंदाची अनुभूती उसळून आली.
ह्या मंदिर निर्माणाची सुरवात 2020 मधे करण्यात आली, पण त्याआधी 2019 मध्ये यूएई सरकारने मंदिरासाठी भूमी हस्तांतरित केली होती. संपूर्ण बांधकामाची शास्त्रशुद्ध आखणी, व्यावहारिक वेळापत्रक, चोख व्यवस्थापन, परस्पर गोष्टीतील सहज समन्वयता आणि अचूक अंमलबजावणी यामुळे कोविडसारख्या अडथळ्यांना पार करत मंदिर ऑक्टोबर 2022 मधे विक्रमी वेळात पूर्ण झाले.
दिसायला आधुनिक वाटणारी मंदिर रचना काही अंशी गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या प्रभावात दिसते, पण मूलतः उत्तर भारतीय ‘नागर शैलीय मंदिर रचना’ आहे. संपूर्ण मंदिर मकराना संगमरवरीत असून वास्तूशास्त्राप्रमाणे पूर्वाभिमुख आहे. ज्योतिषीय शास्त्रानुसार नकारात्मकता घालवून सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित करणार्या अष्टकोनी ‘श्रीयंत्र’प्रमाणे मंदिराची रचना अष्टकोनी आहे. छतावर नऊ कलश स्थापित आहेत.
रविवार असल्याने मंदिरात बर्यापैकी गर्दी होती. कामानिमित्त राहणारे कित्येक तरुण मंडळी वेळ काढून आपल्या इष्टदेवाच्या दर्शनाला आवर्जून आली होती. पर्यटनाला आलेल्या कोरियन, स्पॅनिश, अमेरिकन मंडळी खास मंदिर बघायला आली होती. हे सगळं खूप सुखावणार होतं. दोन्ही संस्कृतीच्या उदात्त समन्वयाने पूर्णत्वास आलेले हे मंदिर म्हणजे देशाबाहेर राहणार्या, आपल्या धार्मिक आस्था जपणार्या कित्येक हिंदूंसाठी जणू ईश्र्वरीय आशीर्वाद आहे.
(पुढच्या भागात मंदिराबद्दल आणखी जाणून घेऊ.)