विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दोन बाजूने ताणून धरले असल्याने जागावाटपाचा हा संघर्ष आता शिगेला पोहचलेला आहे.
काँग्रेसचे राज्याचे नेतृत्व निर्णय घेण्यास सक्षम नाही. त्यांना वारंवार दिल्लीला जावे लागते. नाना पटोलेच जागावाटपात खोडा घालत आहेत. त्यामुळे पटोले उपस्थित असलेल्या बैठकीला आम्ही येणार नाही, अशी भूमिका उबाठा गटाने घेतली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, नाना पटोलेंनी पत्रपरिषदेत जाहीरपणे संजय राऊतांवर पलटवार केला. त्यांच्या बाजूला बसलेले उबाठाचे खा. देसाई यांना ‘असा का करतो रे तो?’ असा प्रश्न विचारून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न दोन्हीकडून झाला.
यावेळी माध्यमे आमच्यात भांडण लावत असल्याचा आरोप करून, सारे खापर माध्यमांवर फोडण्याचा प्रकार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी माध्यमांना सोडून भाजपा आमच्यात भांडणे लावत असल्याचा आरोप दोन्ही बाजूचे नेते करू लागले. एकूणच काय तर, मविआच्या अंतर्गत मतदेभांचे खापर माध्यमे आणि भाजपावर फोडून मानसिक समाधान मिळत असला तरी, यातून विवाद संपुष्टात येणार नाही किंवा तोडगा निघणार नाही, हे वास्तव आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. महाविकास आघाडीतील पेच सोडवण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
सारे काही होत आहे. मात्र, पडद्यामागील घडामोडी वेगळ्या असल्याचे दिसते. कारण, उबाठा गट हा सातत्याने लवकर जागा वाटप करा, असा आग्रह धरून आहे, दुसरीकडे काँग्रेसने मात्र त्यांच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रद्द करून उबाठा गटाला धक्का दिला. काही आतल्या गोटातून येत असलेल्या महितीनुसार, उबाठाने दावा केलेल्या कोणत्याही जागेवर काँग्रेस तडजोड करायला तयार नाही. त्यामुळे शेवटी जागावाटपाचा तणाव अधिक वाढल्याचे चित्र आहे. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा थेट इशाराच दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे