---Advertisement---
धुळे : वन्यजीवांच्या भीतीने शेतकरी आपला जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जात आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांची गैरसोय व धोका कमी करण्यासाठी ‘रात्री ऐवजी वीज दिवसा मिळावी’ अशी मागणी शिरपूर तालुका भाजपा ग्रामीणने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की. शिरपुर तालुक्यातील वनावल, टेंबे, टेकवाडे, चांदपुरी, भरवाडे, खामखेडा, अर्थे, रुदावली, बाळदे, गिधाडे, जातोडे आणि बोरगाव या गावांमध्ये बिबट्या आणि तरस यांसारख्या वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या रब्बी हंगाम अडचणीत आला आहे. या हिंस्त्र प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदन सादर करतेवेळी शिरपूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा भाजप सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया (बोरगाव), वनावलचे शेतकरी युवराज चैत्राम पाटील, नंदलाल साहेबराव पाटील, भाजप तालुका चिटणीस नीलेश बाबुराव देशमुख, मनोहर भाऊराव पाटील, चांदपुरीचे शेतकरी एकनाथ संभू पटेल, विलास हांडू पटेल, ग्रामपंचायत सदस्य लिलाचंद दशरथ पाटील, विकास नामदेव पाटील, भावेश एकनाथ पाटील, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिणामी शेती कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर याबात सुवर्णमध्य काढू, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांना दिले आहे.









