तरुण भारत लाईव्ह । २३ मे २०२३। जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. गिरणा नदी पात्रात पोहताना फिट आल्याने तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली. राजू भूरा भिल असे मृत तरुणाचे नाव आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राजू भिल हा तरूण आपल्या परिवारासह एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे वास्तव्याला होता. त्याला फिट येण्याचा आजार होता. रविवारी दुपारी १ वाजता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्राच्या पाण्यात पोहत असताना त्याला अचानक फिट आले. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत शांत स्वभावाचा आणि प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या राजू याच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.