दुर्दैवी! आईनं निर्भयला दूध पाजले अन् झोक्यात झोपविले, नियतीला मात्र…

जळगाव : लहान मुलाला झोक्यात बसवल्यावर खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना अनेकवेळा समोर आली आहे. पण जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत घडलेली घटना मन सुन्न करणारी आहे.

जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वसंत इंगळे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवार, २५ रोजी वसंत इंगळे हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कामावर जाण्यापूर्वी मुलगा निर्भयला दूध पाजले. मग त्याला झोक्यात झोपविले. निर्भय झोक्यातून पडू नये म्हणून मध्यभागी झोक्याला रुमाल बांधला. त्यानंतर घरात असलेल्या धाकट्या बहिणीला निर्भयवर लक्ष ठेवण्यात सांगून निर्भयची आई रुग्णालयात कामावर निघून गेली.

निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील निर्भयकडे डोकावून पाहिले असता तो झोपेत होता. त्यानंतर जेवण करून परतल्यानंतर पुन्हा निर्भयला पाहण्यासाठी मावशी गेली असता, निर्भय हा झोक्याबाहेर लटकलेला दिसून आला. ते पाहून निर्भयच्या मावशील धक्काच बसला. तिने त्याला बाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नसल्याने लक्षात आल्याने तिने निर्भयच्या आई व वडिलांना तात्काळ बोलावून घेतले.

आई, वडिलांनी तातडीने निर्भयला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत निर्भयने प्राण सोडले होते. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच निर्भयच्या आई वडीलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान दहा दिवसांपूर्वी आनंदी वातावरणात निर्भय याचा पहिलाच वाढदिवस साजरा झाला होता. मात्र तान्हुल्या निर्भयला नियतीने अचानक हिरावून नेल्याने वसंत इंगळे यांच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे.