Durgadas Uike : कौशल्य विकास हाच समृद्धीचा मार्ग, तळोद्यात प्रतिपादन

तळोदा :  कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर या विषयाकडे तत्कालीन सत्ताधाऱ्याने दुर्लक्ष केले. कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक तरुणांमध्ये कौशल्य विकसित झाले तर समृद्धी आणायला कोणीही रोखू शकणार नाही. कौशल्य विकास हाच समृद्धीच्या मार्ग असल्याचे असे प्रतिपादन केंद्रीय जनजाती कार्यालयाचे राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी केले.

श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापूर यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यावतीने मंजूर करण्यात आलेल्या कुशल भारत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर येण्यास एनएसडीसीच्या उपाध्यक्ष अर्चना पाटणकर, योजकचे अध्यक्ष डॉ.गजानन डांगे, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी ,श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत वाणी, शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, माजी मंत्री पद्माकर वळवी, नागेश पाडवी, दिपक पाटील, संचालिका सुनिता वाणी, आदित्य मालपुरे, सायली मालपुरे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

आदिवासी बांधव वनौषधींची परिचित आहेत. अशी वनौषधी व उत्पादने संकलित करून त्यावर प्रक्रिया केली तर त्यातून आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल. या केंद्राच्या माध्यमातून हे स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातील.आदिवासी समाजात असलेल्या व आधुनिक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देत रोजगार उपलब्ध होईल गटात गटात प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करून समृद्ध होईल अशी अपेक्षा श्री उईके यांनी व्यक्त केली.

दरम्यान,राज्यमंत्री उईके व मान्यवरांच्या हस्ते रांझणी येथिल कुशल भारत केंद्र नंदुरबार व अनुदानित आश्रम शाळेच्या नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविकात गव्हाणे यांनी संस्थेच्या कार्याच्या परिचय करून देत जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे हे कुशल भारत केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला.डॉ.डांगे म्हणाले की, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे जीवनमान हे वनपजांवर आधारित आहे.त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जातील. या प्रयत्नांच्या भाग म्हणून हे केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्यातून आदिवासींचे जीवनमान बदलू शकते,असे सांगितले. श्रीमती पाटणकर यांनी एनएसडीसीच्या माध्यमातून देशभरात सुरू असणाऱ्या कामाच्या परिचय करून दिला. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले तर आभार हंसराज महाले यांनी मानले.

आदिवासी क्षेत्रातील पहिले केंद्र
 रांझणी येथील नंदुरबार जिल्हास्तरीय कुशल भारत केंद्र हे जनजातीय व डोंगरी भागातील देशातील पहिले व एकमेव केंद्र असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी आपल्या मनोगतातून दिली.या केंद्राच्या धर्तीवर देशातील जनजातीय क्षेत्रामध्ये कुशल भारत केंद्राची निर्मिती केली जाईल. याप्रसंगी उईके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारांचे देखील कौतुक केले.