---Advertisement---
जळगाव : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी भगीनींसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, ई केवायसीसाठी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे. यात अनेक लाभार्थी महिलांची मोठी अडचण झाली असून यासंदर्भात पती अथवा वडील हयात नसल्यास त्यांचे आधारकार्ड जोडणी कशी द्यावी, असा प्रश्न अनेक लाडक्या भगीनींना पडला होता. मात्र, शासनस्तरावरून ही अडचण दूर करण्यात आली आहे. यासंदर्भात अशा महिलांसाठी संबंधित व्यक्तीचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक केले आहे.
राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिला भगीनींसाठी या योजनेतील पारदर्शकता आणण्यासाठी आगामी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी’ करणे गरजेचे असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक लाभार्थी महिलांची अडचण झाली आहे. जिल्ह्यात सुमारे १० लाख ४ हजार महिला भगीनी लाडकी बहिण योजनेंतर्गत लाभार्थी आहेत. त्यातील ९२ हजार लाडक्या बहिणींची चौकशी अजून सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अपात्र महिलांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच नियमितपणे लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. ई-केवायसीची ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ई-केवायसीसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केले आहे.
या सुविधंतर्गत संबंधित लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र सादर करावे. किंवा न्यायालयाचे आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी. त्यानंतर शहानिशा झाल्यानंतरच या महिला भगीनींना १५०० रूपये लाभदेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
…अशी आहे प्रक्रिया
ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत. अथवा पतीदेखील हयात नाही. किंवा घटस्फोट झालेला आहे. अशा लाभार्थी महिलांनी स्वतः ची ई-केवायसी करून पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र तसेच घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करावी. अंगणवाडी सेविकांनी लाभार्थी महिलांच्या प्रमाणपत्राची तपासणी करून पती अथवा वडील यांची ‘ई-केवायसी’ची सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस करावी, असे निर्देश दिले आहेत.









