हवामान बदलाचे पृथ्वीच्या हालचालीवर दुष्परिणाम,या कारणांमुळे पृथ्वी झाली स्लो अन् दिवस झाले मोठे !

वॉशिंग्टन : हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा परिणाम पृथ्वीच्या हालचालीवरही होत आहे. एका नवीन अभ्यासानुसार, पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाचा बर्फ वेगाने वितळत असून, त्याचे पाणी विषुववृत्ताकडे येत आहे. त्यामुळे पृथ्वीचे वस्तुमान वाढत असून, पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी होत आहे. पृथ्वीचा वेग कमी झाल्यामुळे दिवसाचा कालावधी वाढत आहे. दिवसाची लांबी ८६,४०० सेकंदांवरून काही मिलीसेकंदांनी वाढत आहे. प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमधील शोधनिबंधात ही माहिती समोर आली आहे.

लांबी कशी शोधली?
शास्त्रज्ञांनी शोधून काढले की अवकाशातील रेडिओ सिग्नल पृथ्वीच्या विविध बिंदूवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो. या फरकावरून, दिवसाच्या लांबीत होणारे बदल समोर आले.
पृथ्वीच्या फिरण्याचा वेग अचूकपणे मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमची (जीपीएस) मदत घेतली. जीपीएस पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मिलिसेकंदाच्या शंभरव्या भागापर्यंत मोजू शकतो. हजारो वर्षे जुन्या सूर्यग्रहणांची माहितीही समाविष्ट केली.

चंद्राचे गुरुत्वाकर्षण देखील कारणीभूत
चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील समुद्रातील पाण्याला खेचते, यामुळे भरती-ओहोटी येते. भरती-ओहोटी पृथ्वीच्या परिभ्रमणात घर्षण निर्माण करते, ज्यामुळे तिचे परिभ्रमण मंदावते. यामुळे, लाखो वर्षामध्ये पृथ्वीचा वेग हळूहळू २.४० मिलीसेकंद प्रति शतकाने कमी झाला आहे.

धक्कादायक खुलासे…
अभ्यासाचे सह-लेखक सुरेंद्र अधिकारी म्हणाले, आपण हरितगृह वायू असेच सोडत राहिलो तर २१ व्या शतकाच्या अखेरीस पृथ्वी इतकी उष्ण होईल की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा त्याचा परिणाम अधिक असेल. वर्ष १९०० पासून हवामान बदलामुळे आतापर्यंत दिवस ०.८ मिलीसेकंद मोठा झाला आहे. २१०० पर्यंत केवळ हवामान बदलामुळे दिवस २.२ मिलीसेकंद मोठा होईल.