धरती आबा
एका सामान्य गरीब कुटुंबात जन्माला येऊन, विवंचनेत राहूनही कोणी देव बनणे ही सामान्य गोष्ट नाही. मात्र अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात अत्यंत विवेचना, मानसिक आणि शारीरिक यातना सहन करत बालपणापासून ते देव होण्यापर्यंतचा हा प्रवास बिरसा मुंडा यांनी पूर्ण केला. 19व्या शतकाच्या उत्तराधांत त्यांनी आदिवासी समाजाची स्थिती आणि दिशा बदलून एका नव्या सामाजिक युगाची सुरुवात केली आणि त्याचवेळी शौर्याची नवी गाथा लिहिली. त्यांना केवळ नायकच नाही तर धरती आबा म्हणजेच धरतीचे पिता यासोबतच देवाचा दर्जाही दिला.
जंगल आणि जमिनीसाठी आदिवासींचा संघर्ष शतकानुशतके जुना आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, जेव्हा भारत गुलामगिरीचे चटके सोसत होता, तेव्हा या संघर्षाच्या दरम्यान, 15 नोव्हेंबर 1875 रोजी तत्कालीन रांची जिल्ह्यातील उलिहादू गावात सुगना मुंडा यांच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. असे म्हणतात की, त्या दिवशी गुरुवार होता म्हणून मुलाचे नाव बिरसा ठेवण्यात आले. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, तरीही त्यांच्या वडिलांनी बिरसा यांना मिशनरी शाळेत शिक्षणासाठी पाठवले. ही गोष्ट 1882 सालची आहे. एकीकडे गरिबी होती तर दुसरीकडे इंग्रजांनी आणलेला भारतीय वन कायदा. या कायद्याचा गैरवापर करून आदिवासींचे जंगलातील हक्क हिरावून घेण्यास सुरुवात झाली.
वर्ष 1890 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी शिक्षण सोडल्यानंतर, बिरसा या मुलाने समग्र विचार तपशीलवार समजून घेण्याचा संकल्प केला. यानंतर पुढील 5 वर्षे (1890-95 पर्यंत) बालक बिरसाने धर्म, धोरण, तत्त्वज्ञान, वनवासी रितीरिवाज, मुंडानी परंपरा यांचा सखोल अभ्यास केला. यासोबतच त्यांनी ख्रिश्चन धर्म आणि ब्रिटिश सरकारच्या धोरणांचाही सखोल अभ्यास केला. अभ्यास करत असताना ते म्हणाले – ‘साहेब साहेब टोपी एक !’ विरसांच्या लक्षात आले की आदिवासी समाज आचरणाच्या आधारावर अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकला आहे, तर श्रद्धेच्या बाबतीत तो भरकटलेला आहे. धर्माच्या मुद्दयावर आदिवासी कधी धर्मप्रचारकांच्या मोहात पडतात तर कधी फसवणूक करणाऱ्यांना देव मानू लागतात. यापलीकडे जमिनदारांकडून आणि ब्रिटिश राजवटीकडून होणारे शोषण. बिरसा यांनी आदिवासी समाजाचे तीन स्तरांवर संघटन केले. पहिले म्हणजे अधश्रद्धा आणि ढोंगीपणापासून दूर राहून स्वच्छता आणि शिक्षणाचा मार्ग, दुसरे म्हणजे सामाजिक स्तरासह आर्थिक स्तर सुधारणे. त्यासाठी विरसा यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळून ‘बेगारी पद्धती विरोधात आंदोलन सुरू केले. तिसरे म्हणजे राजकीय स्तरावर आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे. बिरसा मुंडा यांच्या रूपाने आदिवासींना त्यांचा नायक सापडला.
बिरसा यांनी इंग्रजांनी लागू केलेल्या जमीनदारी आणि महसूल व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. बिरसा यांनी व्याजखोर सावकारांविरुद्धही बंड केले. हे सावकार कर्जाच्या मोबदल्यात आदिवासींच्या जमिनींवर कब्जा करत असत. बिरसा मुंडा यांच्या मृत्यूपर्यंत चाललेले हे बंड ‘उलगुलान’ म्हणून ओळखले जाते. ऑगस्ट 1897 मध्ये बिरसा यांनी सुमारे 400 आदिवासींसह एका ठाण्यावर हल्ला केला. मुंडा आणि ब्रिटीश यांच्यातील शेवटची लढाई जानेवारी 1900 मध्ये झाली. रांचीजवळच्या हुंबरी टेकडीवर झालेल्या या लढाईत हजारो आदिवासींनी इंग्रजांचा सामना केला, पण तोफा बंदुकांसमोर धनुष्यबाण हरू लागले. अनेक लोक मारले गेले आणि अनेकांना इंग्रजांनी अटक केली. इंग्रजांनी बिरसा यांच्यावर 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळानुसार ही रक्कम खूप जास्त होती. असे म्हटले जाते की, बिरसाच्या ओळखीच्या लोकांनी 500 रुपयांच्या लालसेने ते लपल्याची माहिती पोलिसांना दिली. अखेर बिरसा यांना चक्रधरपूर येथून अटक करण्यात आली. इंग्रजांनी त्यांना रांची तुरुंगात डांबले. असे म्हणतात की तिथे त्यांच्याहळू हळू विषप्रयोग करण्यात आला. यामुळे 9 जून 1900 रोजी ते शहीद झाले. वर्षानुवर्षे पुस्तकांच्या आतील पानांमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट मर्यादेत बंदिस्त असलेल्या बिरसांच्या या वीर गाथेची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “भगवान बिरसा समाजासाठी जगले, आपल्या संस्कृतीसाठी आणि देशासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले. त्यामुळे ते आजही आपल्या श्रद्धेमध्ये आपल्या भावनेमध्ये आपल्या देवाच्या रूपात उपस्थित आहेत.”
पंतप्रधान मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2021 रोजी बिरसा मुंडा यांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांच्या स्मरणार्थ पहिल्या संग्रहालयाचे उद्घाटन केले. तसेच या दिवसापासून देशात प्रथमच बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्यास सुरुवात झाली.