---Advertisement---
या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये पृथ्वीच्या परिभ्रमणाची गती वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दिवस छोटा होईल. ‘टाईम आणि डेट’च्या एका नवीन अहवालानुसार, ९ आणि २२ जुलै तसेच ५ ऑगस्ट हे सर्वांत लहान दिवस असतील, असा अंदाज आहे. खगोल भौतिकशास्त्रज्ञांनी एका संशोधनाच्या आधारे दावा केलो की, मागील पाच वर्षांपासून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग वाढला आहे.
२०२० पासून पृथ्वी आपल्या अक्षावर सामान्यापेक्षा जास्त वेगाने फिरत असून, इतिहासातील सर्वांत लहान दिवसाचा अनुभव येऊ शकतो. म्हणजेच, हा दिवस २४ तासांपेक्षा कमी असेल. ५ ऑगस्ट सरासरीपेक्षा सुमारे १.५१ मिलिसेकंद कमी असेल असा अंदाज आहे. खगोल भौतिकशास्त्रज्ञ ग्रॅहम जोन्स यांच्या मते, चंद्राच्या कक्षेचा पृथ्वीवर परिणाम होत असून, त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग वाढत आहे.
हा दिवस सामान्य दिवसापेक्षा १.६६ मिलिसेकंदांपेक्षा जास्त लहान असेल. एक सौर दिवस बरोबर ८६,४०० सेकंद म्हणजेच २४ तासांचा असतो. परंतु, पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कधीही पूर्णपणे स्थिर राहिलेला नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. उल्लेखनीय म्हणजे, पृथ्वी तिच्या अक्षाभोवती ३६५ पेक्षा जास्त वेळा फिरते, जे एका वर्षातल्या दिवसांची संख्या आहे.
परंतु नेहमीच असे नव्हते, कारण विविध गणितांनी असे सुचवले की, पूर्वी पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणारे दिवस सुमारे ४९० ते ३७२ दिवस होते. या प्रवेगाला अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पृथ्वीच्या गाभ्यातील हालचाली ग्रहाच्या परिभ्रमणावर परिणाम करू शकतात.
४.५ अब्ज वर्षांपूर्वी सहा तासांचा दिवस
सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील एक दिवस फक्त तीन ते सहा तासांचा असायचा. पण, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी २४ तासांपर्यंत वाढला. दिवसाचा कालावधी काही मिलिसेकंद कमी झाल्याने सामान्य जनजीवनावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, तंत्रज्ञान आणि दूरसंचार, विशेषतः उपग्रह आणि प्रणालीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
२०२१ मध्येही असे घडले होते
२०२० पासून एका अज्ञात कारणामुळे पृथ्वी वेगाने फिरू लागली. यामुळे दिवसाचा कालावधी कमी झाला. २०२१ मध्ये एक दिवस सामान्यपेक्षा १.४७ मिलिसेकंद कमी नोंदवला गेला. २०२२ मध्ये तो १.५९ मिलिसेकंद कमी झाला आणि ५ जुलै २०२४ रोजी दिवस सामान्य २४ तासांपेक्षा १.६६ मिलिसेकंद लहान होता.