---Advertisement---
नवी दिल्ली : भारताची पारंपारिक ओळख ही विविध ऋतूचक्रांनी नटलेला देश अशी आहे. ऋतुंनुसारच आपल्याकडे अनेक सण साजरे करतात. पृथ्वीचे हेच ऋतूचक्र आता पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पृथ्वीच्या वाढत्या उष्णतेमुळे निसर्गाची लय बिघडत चालली आहे.
या बिघडत्या ऋतुचक्राबाबत धोक्याची सूचना विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने ‘डाउन टू अर्थ’ या अहवालातून दिली आहे. हवामान विभाग आणि सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीचा अभ्यास करून विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने एक अहवाल तयार केला. २०१२ ते सप्टेंबर २०२५ या सुमारे १,५०० दिवसांमधील हवामानातील बदलांचा एक नकाशातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. भारतामध्ये तीन ऋतू उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे स्पष्टपणे वेगळे जाणवायचे, मात्र आता वाढत्या उष्णतेमुळे निसर्गाची लय बिघडली आहे. हे ऋतू एकमेकांत मिसळले आहेत. म्हणजेच, कोणत्याही ऋतुत पाऊस पडतो तर कधी हिवाळ्यात उन्हाचा तडाखा जाणवतो. २०२५ वर्षातील जानेवारी ते सप्टेंबरमध्ये देशात सुमारे ९९ टक्के दिवस अतिवृष्टीचा अनुभव आला. या २७३ दिवसांमध्ये भारताच्या काही भागात अतिवृष्टी, उष्णतेची लाट, गारपीट किंवा चक्रीवादळ यासारख्या आपत्तीचा तडाखा बसला.
मागील चार वर्षांत भारतात प्रथमच जवळजवळ संपूर्ण वर्षभर अतिवृष्टीच्या घटनांची नोंद झाली आहे. २०२३ मध्ये केवळ सहा राज्यांमध्ये अशा घटना घडल्या, तर २०२५ मध्ये देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रभावित झाले. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ५९ पैकी ५७ दिवस अतिवृष्टीच्या घटना नोंदवल्या गेल्या, असे विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने एक अहवालातील आकडेवारीवरून असे दिसून येते.
ऋतू बदलाचा पिकावरही परिणाम
ऋतू बदलाचा आणखी उदाहरण म्हणजे अवकाळी पावसामुळे शेतकरी आता जूनमध्ये पेरणी करायला घाबरत आहेत. कधी पाऊस उशिरा येतो, तर कधी तयार झालेले पीक अवकाळी पावसामुळे मातीमोल होते. नोव्हेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण खरीप आणि रब्बी पिकांच्या कापणीत व्यत्यय आला आहे.









