तरुण भारत लाईव्ह ।११ मार्च २०२३। राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा आज ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली.
सूत्रानुसार, कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व हसन मुश्रीफ यांचे समर्थक हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.