---Advertisement---
जळगाव : यावल तालुक्यातील भालोद येथील डॉ.सुनील नेवे यांना राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकविले आहे. डॉ. भा. ल. भोळे विचार मंच नागपूर आणि राज्यशास्त्र व इतिहास विभाग, यशवंत महाविद्यालय सेलू जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राजकीय व्यवस्था : निवडणूक प्रक्रिया आणि मतदार वर्तन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र वर्धा येथे 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात आयोजित राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धामध्ये सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद तालुका यावल येथील राज्यशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉ.सुनील नेवे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यांनी “समकालीन भारतीय लोकशाहीतील निवडणूक आयोगाची भूमिका” या विषयावर शोधनिबंध सादर केला.
याप्रसंगी डॉ.सुनील नेवे यांचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. भा. ल. भोळे विचार मंचाचे अध्यक्ष शेषकुमार एरलकर, सचिव डॉ. अशोक काळे ,प्राचार्य डॉ. संदीप काळे, डॉ.अनंत रिंधे, डॉ. योगेश उगले(परतवाडा, यवतमाळ), डॉ. दिपाली घोगरे(पातूर,अकोला), कथन शहा(मुंबई), डॉ. प्रवीण भागडीकर राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आदी उपस्थितीत होते.
या शोधनिबंधात डॉ. सुनील नेवे यांनी मते व्यक्त केले. ते म्हणाले की, भारतातील निवडणूक आयोग जगातील सर्वात उत्तम असा निवडणूक आयोग आहे. भारतीय लोकशाही चौकटीतील एक कोनशिला म्हणून निवडणूक आयोगाकडे पाहता येईल. जगात भारत हा असा एकमेव देश आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोग हा अत्यंत निर्भीडपणे निष्पक्षपणे आपली भूमिका बजावीत आहे. विशेष करून भारताचे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेशन यांचा कार्यकाळ जनतेच्या स्मरणात राहिला आहे. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना मर्यादित स्वरूपाचे अधिकार आहेत. जर आपल्या देशात निवडणूक आयोग स्वतंत्र आहे तर निवडणूक आयोगाला त्यांचे अधिकार वापरण्याची मुभा मिळावी. निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा जपावी, निवडणूक आयोग जगातील सर्वश्रेष्ठ आयोग म्हणून कायमस्वरूपी टिकावा, याकरता निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील शंकांचे निरसन सातत्याने करावे असे डॉ. सुनील नेवे असे सांगितले.