---Advertisement---
जळगाव : धावत्या रेल्वेतून उतरताना पाय घसरल्याने २९ वर्षीय तरुण रेल्वेखाली आला. त्यामुळे तब्बल आठ डब्बे तरुणाच्या अंगावरून निघून गेले. मात्र, सुदैवाने या घटनेत तरुण बचावला असून डाव्या पायाची पाचही बोटे कापली गेली आहे. पाचोरा रेल्वेस्थानका नजीक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तरुणावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जयंत भदाणे (२९) रा. पडासखेडे ता. पारोळा हा तरुण सांगली येथे खाजगी कामानिमित्त गेला होता. दरम्यान ४ ऑगस्ट रोजी राहुल मंगला एक्स्प्रेसमध्ये बसला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वेस्थानका नजीक मंगला एक्स्प्रेस धिम्या गतीने जात असतांना राहुल याने एक्सप्रेसमधुन उतरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी राहुल याचा पाय घसरला व तो एक्स्प्रेसखाली सापडला. मंगला एक्स्प्रेसचे आठ डब्बे राहुल याचे अंगावरुन गेले.
या अपघातात सुदैवाने राहुल भदाणे याचे प्राण वाचले असले तरी राहुल यास आपल्या डाव्या पायाची पाचही बोटे गमवावी लागली आहे. घटनेची माहिती मिळताच, लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात पो. काॅ. विलास जाधव हे जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व दादु पाटील यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व दादु पाटील यांच्या मदतीने राहुल भदाणे यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन, त्यावर उपचार सुरू आहेत.
घटने प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विलास जाधव हे करीत आहे.









