Burglary : भुसावळात भरदिवसा आठ लाखांची घरफोडी

भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील गजानन अपार्टमेंटमधील रहिवासी नरेश घनश्यामदास रोहाडा यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे १० तोळे सोने व आठ हजारांची रोकड लांबवली. घरफोडीचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी चार वाजता उघडकीस आला. शहरात सातत्याने वाढणाऱ्या चोऱ्या-घरफोड्यांमुळे रहिवासी धास्तावले आहेत.
वांजोळा रोडवरील गजानन अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ३०३ मध्ये नरेश रोहाडा हे राहतात. त्यांचा शिलाई मशीन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी माहेरी गेल्या नंतर आले. नरेश हे शनिवारी नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून दुकानात सकाळी गेले. ते दुपारी चार वाजता घरी आले असता घराला कुलूप दिसले नाही व घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सर्व साहित्यांची फेकाफेक झाल्याने घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ त्यांच्या मित्र परिवाराला व बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांनी भेट दिली. यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारी यांनीही चोरीची पहाणी केली. रोहाडा यांनी घरात ठेवलेले आजच्या बाजारभावानुसार साडेसात लाख रुये किंमतीचे १० तोळे सोने व आठ हजार रूपये रोख चोरट्यांनी चोरून नेल्याचे सांगितले. पोलिसांकडून या भागातील सीसीटिव्ही फुटेजची पहाणी करण्यात आली. चोरी झाल्यामुळे प्रशासनाने जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण केले. भर दुपारी चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

साहित्याची फेकाफेक
चोरट्यांनी चोरी केल्यावर दाराला लावलेले कुलूप सुध्दा चोरून नेले. रोहाडा यांच्या घराचे कुलूप कुठेही मिळून आले नाही, असे त्यांनी सांगितले. दुपारी चार चवाजता घरी आल्यामुळे घरात चोरी झाल्याचे कळाल्याचे रोहाडा यांनी सांगितले. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. कपाटातील साहित्य, दिवाणमधील साहित्य घरात फैलविले होते.