---Advertisement---
मुबई । राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचे पत्र सोपवले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारीही सुरु आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले होते. त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे भाजप महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. त्यातच आज भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. हा शपथविधी सोहळा कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार याची माहिती जाणून घेऊया…
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवार, ५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होईल.
---Advertisement---