---Advertisement---
जळगाव : वाळत टाकलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून भावना राकेश जाधव (७१, रा. महाबळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी तीन वाजेच्या महाबळ सुमारास परिसरातील गजानन रेसिडेन्सी येथे घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महाबळ परिसरातील भावना जाधव यांचे पती आणि मुलगा कामानिमित्त बाहेर गेलेले असताना दुपारी गॅलरीत तारेवर टाकलेले कपडे घेण्यासाठी त्या गेल्या. यावेळी तारेत विद्युत प्रवाह उतरल्यामुळे त्यांना विजेचा जोरदार शॉक लागून त्या खाली कोसळल्या.
सकाळी भावना जाधव यांचा नातू हा गिझर सुरु करण्यासाठी गेला. यावेळी त्याला विजेचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर दुपारी आजीला विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीपासूनच अपार्टमेंटमध्ये विद्युतप्रवाह उतरला असल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते.
काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने भावना जाधव यांची मुलगी आणि सून गॅलरीकडे गेले. यावेळी त्यांना भावना जमिनीवर पडलेल्या दिसल्या तर त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. जखमी अवस्थेत भावना जाधव यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित केले.
मुलगी रक्षाबंधनाला आली
भावना जाधव यांची मुलगी रक्षाबंधनाकरिता तीन चार दिवसांपूर्वी माहेरी आली होती. मात्र रक्षाबंधनापूर्वीच आईवर काळाने झडप घातल्याने मुलीला अश्रू अनावर झाले होते.