दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील सत्ताधारी भाजप पक्षावर, जाणीवपूर्वक यमुनेत औद्योगिक कचरा टाकत, नदीत ‘विष मिसळून’ लोकांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, भूपेंद्र यादव आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांची भेट घेतली होती. लोकांमध्ये “दहशत” निर्माण केल्याबद्दल नेत्याने त्यांचे आरोप मागे घ्यावेत आणि माफी मागावी, अशी मागणही भाजपने केली होती.
हेही वाचा : Washington plane crash: अमेरिकेत प्रवाशी विमानाची हेलिकॉप्टरला धडक, पहा अपघाताचा VIDEO
दरम्यान, निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्या यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने केजरीवाल यांना उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पाण्यात विष मिसळल्याचे ठोस पुरावे देण्यास सांगितले आहे. जर उत्तर समाधानकारक नसेल तर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
निवडणूक आयोगाने केजरीवाल यांनी केलेल्या विधानांवर तथ्यात्मक आणि कायदेशीर बाबींवर पुराव्यांसह उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यमुनेत विष कोणी मिसळले? यमुनेत कोणते विष मिसळले होते? कोणत्या अभियंत्याने विष शोधून काढले? विष कुठे मिसळले होते? पाण्यात विषाचा प्रसार कसा रोखला गेला? अश्या प्रश्नांबाबत अरविंद केजरीवाल यांना ठोस पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुरावे सादर केल्यास आयोग प्रकरणाची तपासणी करू शकेल आणि योग्य कारवाई करू शकेल,” असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच अशा आरोपांमुळे शेजारील राज्यांमधील रहिवाशांमध्ये वैर निर्माण होणे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.