तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । निवडणूक वादातून माजी सरपंचाच्या छातीवर बंदूक लावत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे मंगळवारी हा प्रकार घडला. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे मंगळवारी सायंकाळी सव्वा ६ वाजेच्या सुमारास येथील माजी सरपंच अनिल चौधरी हे गावात असताना ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी याने त्यांच्या छातीला बंदूक लावून धमकी दिली तर त्याच्यासोबत असलेला तुषार संजय गोसावी याने कॉलर पकडून चापटा-बुक्यांनी मारहाण केली. यावेळी नागरीक जमा झाल्याने दोघांनी पळ काढला.
दरम्यान, चौधरी यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर गोसावी व तुषार गोसावी यांचे विरुध्द भादंवि कलम 307, 323 शस्त्र कायदा 3/25, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दिपक मोहीते तपास करीत आहे. दरम्यान, संशयीतांना अटक करण्यासह गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरीकांनी जामनेर पोलिस ठाणे आवारात ठिय्या आंदोलनही केले.