लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर एनडीएने आता सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते संध्याकाळी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा करू शकतात.
दुसरीकडे इंडिया आघाडीनेही भविष्यातील रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना आपल्या छावणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतो, असे बोलले जात आहे. आज सकाळी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आपापल्या आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी विमानाने दिल्लीला पोहोचले तेव्हा या शक्यतांना बळ मिळाले.
दरम्यान, एनडीएच्या घटक पक्षांनी पुन्हा एकदा एकमताने पंतप्रधान मोदी यांची नेता म्हणून निवड केली आहे. बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर २१ नेत्यांच्या सह्या आहेत. यामध्ये टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांचा समावेश आहे. आज संध्याकाळी एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे मानले जात आहे.
नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा करत 8 जून रोजी शपथ घेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.