निवडणूक रणधुमाळी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत मतदारांचा उत्साह

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव- जिल्ह्यात १४० ग्रामपंचायतीसाठी रविवार १८ डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील १४० पैकी १२२ ग्रा. पं.त सकाळी ७.३० ते ५.३० वाजेदरम्यान निवडणुकीसाठी २ लाख १५ हजार ६२९ मतदारांपैकी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीत दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी ५९.९० टक्के मतदान झाले तर दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्याचे चित्र दिसून आले.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगातर्फे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रा.प.साठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. १४० ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रा.प.बिनविरोध झाल्या आहेत.उर्वरित १२२ ग्रामपंचायत क्षेत्रात ४२१ मतदान केंद्रावर आज रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक मतदानादरम्यान सकाळी कामाला जाणार्‍या मतदारांनी मतदान केले. काही ठिकाणी चौकाचौकात विविध गटाचे पदाधिकारी सदस्य मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करतांना दिसून येत होते. एकंदरीत सकाळी मतदारांचा फारसा उत्साह नसला तरी दुपारी दोन ते तीन नंतर मात्र कामावरून परतलेल्या शेतकरी मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावलेल्या दिसून आल्या. यात जळगाव तालुक्यात ६२५७ (५९.२८), जामनेर १०८०६(५७.७६), धरणगाव ३४३५(६१.६३), एरंडोल ३५२०(५३.३३), पारोळा ३५८२(६२.८९), भुसावळ ६०२९(५०.२९), मुक्ताईनगर ३८३८(४१.२५), बोदवड १९९८(४६.१०), यावल ९६७३(४६), रावेर १७७२३(५१.६१), अमळनेर १२२२४(४५.०३), चोपडा ३०२८(५१.२९), भडगाव ७४४९(५१.१६) आणि चाळीसगाव १७८०६(५०.०३ टक्के)मतदारांनी मतदान केले असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.