धुळे : विद्युत मोटर चोरट्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १९ हजार रुपये किमतीच्या ५ विद्युत मोटारी हस्तगत करण्यात आल्या. प्रवीण शालिग्राम गायकवाड (वय २२, रा. कालिका माता मंदिराजवळ, नकाणे, ता. धुळे) असे संशयिताचे नाव आहे.
गणेश रमेश कार्लेकर (रा. राजरत्न कॉलनी, साक्री रोड, धुळे ) यांच्या घराच्या पोर्चमधून चोरट्याने पाण्याची इलेक्ट्रिक मोटार चोरुन नेली होती. हि चोरी ५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याबाबत कार्लेकर यांनी शहर पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
शहरात इलेक्ट्रिक मोटार आणि किरकोळ चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहर पोलिस ठाण्याच्या शोध पथकास दिल्या होत्या. यानुसार पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने माहिती काढली. शुक्रवारी पांझरा नदीजवळ प्रवीण शालिग्राम गायकवाड (वय २२, रा. कालिका माता मंदिराजवळ, नकाणे, ता. धुळे) हा संशयितरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, कार्लेकर यांची इलेक्ट्रिक मोटार चोरीची कबुली दिली.
तसेच यापूर्वी ठिकठिकाणी चोरी केलेल्या इलेक्ट्रिक मोटारदेखील त्याने पोलिसांना काढून दिली. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आलेला आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक पाटील व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, शोध पथकाचे कुंदन पटाईत, रवींद्र गिरासे, महेश मोरे, प्रवीण पाटील, मनीष सोनगीरे, अमित रनमळे, तुषार पारधी, अमोल पगारे, मुकेश जाधव, वसंत कोकणी, शाकीर शेख, योगेश ठाकूर यांनी ही कारवाई केली.