नवी दिल्ली : मोदी सरकारने मराठी जनांची दीर्घकाळपासूनची मागणी मान्य करून अखेर मराठी भाषेस ‘अभिजात’ दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारपरिषदेत दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजात भाषा दर्जाविषयी महत्त्वाचा निर्णय घेऊन मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. अभिजात भाषा भारताच्या प्रगल्भ आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाचे संरक्षक म्हणून काम करतात, प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मैलाच्या दगडाचे सार मूर्त रूप देतात. त्यामुळे भारतीय वारशाचे जतन करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने २०१३ साली केंद्र सरकारकडे मराठी भाषेस ‘अभिजात’ दर्जा देण्याची विनंती करणारा प्रस्ताव पाठवला होता. हा साहित्य अकादमी अंतर्गत असलेल्या भाषाविज्ञान तज्ज्ञ समितीकडे (एलईसी) पाठविण्यात आला होता. समितीने मराठीस ‘अभिजात’ दर्जा देण्याची शिफारस केली होती. यादरम्यान, बिहार, आसाम, पश्चिम बंगालमधून पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव आले होते. पुढे २०१७ साली केंद्रीय गृह मंत्रालयाने या विषयावरील आंतरमंत्रालयीन सल्लामसलीमध्ये ‘अभिजात’ दर्जाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालयानेही ‘अभिजात’ दर्जासाठी अन्य भाषा कशा पात्र होऊ शकतात, अशी सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.
अभिजात भाषा म्हणून भाषांचा समावेश केल्याने विशेषत: शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात लक्षणीय रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याव्यतिरिक्त, या भाषांच्या प्राचीन ग्रंथांचे जतन, दस्तऐवजीकरण आणि डिजिटायझेशन संग्रहण, भाषांतर, प्रकाशन आणि डिजिटल मीडियामध्ये नोकऱ्या निर्माण करेल. व्यापक सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणार आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो : फडणवीस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
“हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.
अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.