एलन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर ; पंतप्रधान मोदींची घेणार भेट

 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्लाचे सीईओ एलन मस्क लवकरच भारतात येत आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. एलन मस्क यांनी काल रात्री एक्सवर आपल्या भारत भेटीची माहिती देणारी एक पोस्ट शेअर करत भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत असे स्पष्ट केले आहे.

एलन मस्क यांनी गेल्या वर्षभरात दोनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. परंतु, एलन मस्क पहिल्यांदाच भारतात पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. एलन मस्क यांच्या या दौऱ्याबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. एलन मस्क आपली कंपनी टेस्ला भारतीय बाजारात लाँच करणार आहेत. टेस्लाचे इलेक्ट्रिक वाहन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याच्या योजनेवर काम सुरू झाले आहे. अलीकडेच टेस्लाच्या वाहनांबाबत बातमी समोर आली होती की, कंपनीने भारतीय ड्रायव्हर्सचा विचार करून बर्लिनमध्ये उजव्या हाताच्या ड्रायव्हर्ससाठी कारची निर्मिती सुरू केली आहे. सरकारचे नवे ईव्ही धोरण
सरकारने गेल्या महिन्यातच इलेक्ट्रिक वाहनांबाबत नवे धोरण आणले आहे. सरकारला भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवायचे आहे, हे या नव्या धोरणातून दिसून येते. या धोरणानुसार ज्या ऑटोमोबाइल कंपन्यांना भारतात इलेक्ट्रिक वाहने आणायची आहेत, त्यांना भारतात किमान ४१५० कोटी म्हणजेच ५०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच या कंपन्यांना तीन वर्षांच्या आत भारतात उत्पादन सुरू करावे लागणार आहे. तसेच कारमध्ये वापरले जाणारे २५ टक्के पार्ट्स भारतात विकले जातात.