जळगाव : कोरोना संसर्ग निर्बंध शिथिलतेनंतर शहरासह तसेच जिल्हाभरात पदपथांवर ठिकठिकाणी लहान मोठ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण फोफावलेले दिसून येत आहे. जळगाव शहरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरच नव्हेतर राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांभोवती परिसराला पदपथांवर हॉकर्सने घेरले असल्याचे चित्र आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच की काय अतिक्रमण हटाव पथकाची भीती नसल्याचे चित्र दिसत आहे.
जळगाव शहरात स्टेशन रोड परिसराकडे जाणार्या रस्त्यावर नेहरू पुतळ्याजवळच केवळ रविवारच्या दिवशी दुकाने बंद असल्याने सण्डे बाजाराची गर्दी दिसून येते. नेहरू चौक वगळता अन्य ठिकाणी सर्वच दिवशी पदपथावर मोबाईल कव्हर, शूज विक्रेते, पाणीपुरी, चाट भांडार ऑम्लेट, चटपटीत पावभाजीसह अन्य खाद्यपदार्थ तसेच शूज, स्कूल बॅगसह भाजीपाला, फळे आदी विक्रेत्यांचे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाची गर्दी झालेली आहे.
स्टॉप सोडून अन्यत्र रिक्षा थांबे
शहरात अनेक ठिकाणी अॅटो चालकांसाठी रिक्षा थांबे निश्चित करण्यात आले आहेत. परंतु बरेचसे अॅाटोचालक नियोजित रिक्षा स्टॉप सोडून शालेय महाविद्यालय प्रवेशव्दारासमोर तसेच प्रवासी घेण्याच्या निमित्ताने कोठेही प्रवाशांची चढउतार करीत असल्याचे दिसून येत आहेत, याकडे स्थानिक अतिक्रमण प्रशासन किंवा वाहतूक पोलीस प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मनुष्यबळाअभावी अतिक्रमण हटाव पथक निष्रभ
लहान-किरकोळ विक्रेत्यांनी व्यापले रस्ते शहरात टॉवर चौक, चित्रा चौक, नेहरू चौक, खान्देश कॉम्लेक्स, बस स्टॅण्ड रोड आदी परिसरात लहान मोठे हॉकर्सव्दारे अनेक वस्तूंचे छोटे मोठे स्टॉल हातगाडी लावलेली असते. यात बहिणाबाई उद्यान परिसरासह अनेक ठिकाणी असलेल्या राष्ट्रपुरूषांच्या पुतळयाभोवतीच्या परिसरालासुद्धा सोडलेले नाही.पदपथ व्यापल्याने रहदारीस अडथळा लहान मोठ्या वस्तू विक्रेत्यांनी पदपथ व्यापल्याने पायी चालणार्यासह रस्त्यांवरील वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यातच दुचाकी चालकच नव्हेतर अॅटो वा अन्य वाहनचालक बेपवाईने विरूद्ध दिशेने येणार्या वाहनचालकांमुळे पादचार्याना अनेक अडचणींनी सामोरे जावे लागत आहेत. बर्याच वेळेस वाहनचालक किशोरवयीन मुली वा महिलांच्या अंगचटीला येवून धडकण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. परंतु उगाच वाद नको म्हणून अनेक महिला याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात पदपथावरील विके्रत्यांना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची वाटणारी भीती कमी झाली आहे. याचे मुख्य कारण महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचार्यांना गळती, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळच नाही. अतिक्रमण पथकाकडे लहान मोठी वाहने आहेत. परंतु कारवाईसाठी जाणार्या केवळ दोन-चार कर्मचार्यांना अतिक्रमणधारक जुमानत नाहीत. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर विक्रेत्यांनी बस्तान बसवले असून कारवाईसाठी जाणार्या पथकालाच हॉकर्सकडून हुसकावून लावण्याचे प्रकार वारंवार घडतात.
पक्के अतिक्रमणांकडेदेखील दुर्लक्ष
मनपा नगररचना विभागाकडे 25 ते 30 पेक्षा अधिक पक्के अतिक्रमण हटविण्याचे आदेश आहेत. परंतु, या अतिक्रमण हटाव पथकाकडे पुरेस कर्मचारी संख्याबळ नसल्याने पक्के अतिक्रमणे काढली जात नसल्याचे दिसून येत आहे.