अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण मराठीतून – देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मराठीतून करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

तसेच मराठी टिकेल का? असा प्रश्न विचारला जातो. अशावेळी हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. आपणच पुढच्या पिढीला अभिव्यक्तीचं साधन म्हणून आपली भाषा देणार नाही, तर भाषा टिकेल कशी असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.

ते पुढं म्हणाले की, मातृभाषेचा गोडवा ओळखण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मोदीजींच्या लक्षात आलं की, भारतीय भाषा टीकवायच्या असतील तर त्यांना ज्ञान भाषांमध्ये रुपांतरीत करावं लागेल. जोपर्यंत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेवरील शिक्षण हे आपल्या मातृभाषेत होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा वैश्विक भाषा होऊ शकत नाही. त्यामुळे मोदींनी नवीन शैक्षणिक धोरणात सर्व राज्यांना सूचना केल्या की, राज्यांनी आपल्या मातृभाषेत सर्व उच्च आणि तंत्रशिक्षणाचा सिलॅबस सुरू करा आणि त्यातून शिक्षण द्या. यात महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान महाराष्ट्रात लवकरच अभियांत्रिकी असो वैद्यकीय असो वा कोणतही शिक्षण असो मराठीतून सुरू कऱणार आहोत. त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होणार, अशी घोषणाही फडणवीसांनी केली.

३५-४० वर्षापूर्वी जर्मनीत एका कोर्ससाठी मला नामांकन मिळालं होतं. त्यावेळी इंटरनेट नवीन होतं. त्यावेळी माझ्यासोबतचा चिनी विद्यार्थी चिनी भाषेत अभ्यास करत होता. जर्मन डोईश्च भाषेत इंटरनेट वापरत होता. फ्रेंच विद्यार्थी फ्रेंच भाषेत करत होता. केवळ आम्ही इंग्रजीतून करत होतो. जर्मनीने सर्व शिक्षण जर्मन भाषेत केलं. विशेष म्हणजे जगातील बेस्ट इंजिनियर्स हे जर्मन आहेत. त्यांना इंग्रजीचा तिरस्कार नाही. मग तेवढीच वैश्विक भाषा होण्याची शक्ती मराठीतही आहे. मराठीला तिथपर्यंत पोहोचविण्याच काम येत्या काळात करावं लागेल, असंही फडणवीसांनी नमूद केलं.