पाणीपुरवठा योजनांच्या दिरंगाईप्रकरणी 170 कंत्राटदारांना अभियंत्यांकडून नोटिसा

तरुण भारत लाईव्ह ।१४ जानेवारी २०२३। जिल्ह्यात 1360 पाणी योजनांच्या कामास मंजुरी देण्यात येऊन कामांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मात्र कार्यारंभ आदेश देऊनही तीन महिन्याचा कालावधी उलटूनही कंत्राटदारांनी पाणी योजनाच्या कामांना सुरूवात केलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांनी जिल्ह्यातील 170 पाणी योजनांच्या कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या आहेत.

दोन आठवड्यात योजनांचे काम सुरू न केल्यास संबंधित योजनांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाणी योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे. हर घर नल, घर घर जल या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणी योजनांना गती देण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन कार्यक्रम राज्यभर हाती घेतला आहे. या अत्यावश्यक योजनांचे काम पूर्णतेसाठी शासनस्तरावरून पाठपुरावा केला जात असल्याने जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पाच दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे नोटीसव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यात पाणी योजनांच्या कामांना गती देण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. पाणी योजनांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देऊन तीन महिन्यानंतरही कंत्राटदारांनी कामे सुरू केलेली नाही. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पाणीयोजनांच्या कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात येत आहे.

                                                                                                                                                 – गणेश भोगावडे, कार्यकारी अभियंता,
                                                                                                                                                ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प.,जळगाव