---Advertisement---
विक्की जाधव
अमळनेर : शहरातील नागरिक सध्या दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. एकीकडे गडुळ, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास घातक पाणीपुरवठा, तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घनकचऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून डेंगू, ताप, सर्दी, उलटी, अतिसार यांसारख्या आजारांचे रुग्ण दररोज वाढत आहेत.
नगरपरिषद व आरोग्य विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. मुख्याधिकारी तुषार नेरकर यावर बोलण्यास तयार नाहीत. त्यांच्या कार्यालयात नागरिक समस्या घेऊन जात असता, वेळोवेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर अनुपस्थित असतात.
शहरातील आर के नगर पासून तर थेट पैलाड भागापर्यंत अनेक ठिकाणी साचलेली सांडपाणी व्यवस्था, उघड्यावर साचलेला कचरा, वास आणि मच्छर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच १०-१० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा तोही गढूळ स्वरूपाचा हे संकट अधिक आहे.
पाणीपुरवठाचे इंजिनियर प्रवीण कुमार बैसाणे हे देखील अकार्यक्षम ठरत आहेत. एकंदरीत मुख्य अधिकाऱ्यांचे वचक पालिकेतील कोणत्याही विभागातील अधिकाऱ्यांवर राहिले नाही. “शासनाचे ‘स्वच्छ भारत’ आणि ‘आरोग्य तुमच्या दारी’ हे फक्त बॅनरपुरतेच राहिले आहेत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
लवकरात लवकर कडक उपाययोजना न केल्यास लोकांमध्ये आरोग्यविषयक असंतोष उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून या प्रश्नांची तातडीने दखल घेणे गरजेचे झाले आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.