---Advertisement---

नव्या युगातही सावकारी पाशाचा विळखा कायमच…!

by team
---Advertisement---

आजचं नवं युग शिक्षणाचं, सुधारणांचं युग. बँक, सहकारी पतपेढ्या, सोसायट्यांमधून कर्जाची सुविधा उपलब्ध होत असतानाही खासगी सावकारीच्या पाशात अडकत्याच्या घटना कानावर येतच असतात. बँकांकडून कर्जासाठी कागदपत्रे लागतात. खासगी सावकारी कर्ज पटकन मिळते. खासगी कर्जाच्या व्याजाचा दर अव्वाच्या सव्वा असतो. पण लवकर मिळते म्हणून माणूस फसतो. अशीच अलीकडील काळात जळगाव शहरात घडलेली एक घटना कानावर आली.

शहरातील एक अपार्टमेंट फ्लॅटमधील घराच्या दरवाजाची बेल खणाणली… घरात महिला एकटीच होती. तिने आधी दरवाजा उघडून कोण असेल. म्हणून डोकावून पाहिले… तिच्या काळजात धस्स झालं. समोर तीन गुंडप्रवृत्तीच्या व्यक्ती उभ्या होत्या… घरात आधाराला दूसरे कोणीही नाही. काय करावे, मनात संभ्रम दाटला. महिला स्वाभाविकपणे प्रथमतः घाबरली. नंतर थोडी हिंमत दाखवत तिनं विचारलं, कोण हवंय तुम्हाला… काही काळ शांतता… मग तोंडात भरलेल्या गुटख्याचे वंथ करत लालजर्द डोळ्यांचा, तिघांमधील एक जण म्हणाला, “मावशे, तुझा मुलगा कोठे आहे…?” यावर ती म्हणाली, “तो तर ड्यूटीवर गेलाय. पण का?… काय झालं?…” त्यावर तो उत्तरला, “त्याने आप्पाकडून पैसे उसनवार घेतले होते… थोडे दिले, पण आता व्याजासह रक्कम दीड लाख झालीयं…” तो राकट स्वरात बोलला. हे ऐकून ती महिला एकदम घाबरली.. आपला मुलगा अवैध सावकारीच्या पाशात अडकलाय हे तिच्या लक्षात आले… मावशी घाबरल्याचे पाहून दुसरा समजावणीच्या सुरात म्हणाला, “मावशी घाबरू नको, दार उघड.

आम्ही सगळं समजावून सांगतो.” तिचा नाइलाज झाला. मग महिलेने थरथरत्या हातांनी दार उघडले. आत आलेल्या त्या युवकांनी सर्व घटनाक्रम सांगितला… पैसे दिले नाही, तर नाइलाजाने तुझ्या पोराला उचलून नेऊ: असा दमच त्यांनी भरला…. आणि महिलेचे सात गेले आणि पाच राहिले. भयकंपित असतानाही महिलेचे पुत्रप्रेम जागे झाले नवरा गेला, पोराचे बरेवाईट झाले तर करायचे काय? तिने हिंमत करत या युवकांना सांगितले, “मुलाच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा…. पुढील आठवड्यात या अन् पैसे घेऊन जा…” नंतर ही मंडळी रवाना झाली. या आईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते….. छाती धडधडत होती.. काळजात काळजीचा काटा रुतला. तिने तडक दागिन्यांचा डबा काढला… अन विचार न करता दागिने मोडले… काही दिवसांनी आलेल्या या युवकांना तिने पैसे दिले अन् रवाना केले… आज हाताशी दागिने होते म्हणून ही महिला मुलाचा जीव वाचवू शकली… शहरात व जिल्ह्यात अशी अनेक कुटुंबे आहेत की, गरजेपोटी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून ते उसनवार पैसे घेतात अन् नंतर अवैध सावकारीच्या पाशात गुरफटत जातात.

अनेकांना तर अगदी घरादारावर या प्रकारामुळे तुळशीपत्र ठेवावे लागते, परवाचीच घटना बघा ना… सावकारी जाचास कंटाळून एका संगणक व्यावसायिकाने घरातील दोन चिमुरडे जीव व पत्नीचा विचार न करता आत्महत्या केली. मुकेश पाटील असे या मृत व्यक्तीचे नाव. मुकेशने सावकारी कर्ज घेतले होते. मुलीला आजारातून वाचविण्यासाठी त्याने सावकाराकडून लाखाची रक्कम घेतली होती. पैकी ६५ हजार परतही केले. मात्र उर्वरित पैशांसाठी तगादा व धमक्या मिळत होत्या. अखेर मुकेशने सावकारी त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपविली. मुकेशच्या पश्चात दोन लहान-लहान अपत्ये व पत्नी आहे. तीन जीवांच्या उर्दनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पतीने जीवनयात्रा संपविली. पत्नीच्या आयुष्यात अंधाराचे साम्राज्यच निर्माण झाले आहे… हृदय हेलावून सोडणारा तिचा आक्रोश पाहवत नाही… पोटच्या पोरांना सांभाळायचं की पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा? हा प्रश्न एका दिवसाचा, वा काही महिन्यांचा नाही.

पूर्ण आयुष्याचा आहे. कोण देणार आभार? मग आता आमची यंत्रणा काय करणार? मयताच्या नातेवाइकांनी तर पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. अगोदर कारवाई करा, नंतर मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका नातेवाईक मंडळींनी घेतली होती. मात्र येथेही झुंडशाहीचा विजय झाला… या प्रकरणात काय कारवाई केली किंवा करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सावकारी हुकूमशाहीचा विळखा आजही जिल्ह्यात कायम असत्याचेच आता लक्षात येतेयं अमळनेरमधील एका लेडी डॉनच्या सावकारीची कशी दहशत आहे हे ‘तरुण भारत’ने यापूर्वी प्रसिद्ध केले… किती अवैध धंदे येथे चालतात त्यावरही प्रकाशझोत टाकला होता. मात्र… खाकीला अद्यापही जाग आलेली नाही… अवैध सावकारीतून मिळणाऱ्या पैशाच्या आधारावर अनेक कृत्ये सर्रास केली जातात, याला लगाम घातला गेला पाहिजे. कारण यात अतिशय सामान्यातील सामान्य व्यक्ती भरडल्या जात आहेत. ‘कानून के हाथ लंबे होते हैं’ याचा प्रत्यय जनतेला आला पाहिजे.

बँकेच्या कर्ज धोरणाची क्लिष्टता लक्षात घेऊन शेतकरी बीजवाई आणि शेतीसाठी सावकाराकडून कर्ज घेतात… पण निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक येत नाही.. परिणामी तो सावकारी विळख्यात अडकतो… आणि जमीन गमावतो… कधी जीवही देतो… हे दृष्टवक्र वर्षानुवर्षे सुरू आहे. यातूनच शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या घटनांना आळा बसविला जाणे गरजेचे आहे.

चंद्रशेखर जोशी

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment