ब्राह्मण समाजाला मोठा गौरवशाली इतिहास आहे. ब्राह्मण सामाजाने संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. मात्र, सध्या ब्राह्मण सामाजापुढे अनेक सामाजिक प्रश्न उभे ठाकले आहेत. मुला-मुलींच्या विवाहाचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न असो की, लव्ह जिहादसारखी समस्या असो. या समस्यांनी ब्राह्मण समाजासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बहुभाषिक ब्राह्मण समाजाने एकजूट व्हावे, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी केले आहे. ते भगवान परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत लाईव्ह’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
मुलाखतीत पुढे बोलताना श्रीकांत खटोड म्हणाले, ब्राह्मण समाज हा सुसंस्कृत, बुद्धीजीवींचा समाज आहे. जळगावात ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या ५० शाखा आहेत. मात्र, या शाखा विखुरत्या आहेत. या सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून आम्ही गेल्या १६ वर्षांपासून भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढत आहेत. भगवान परशुराम जयंती महोत्सवानिमित्त यंदा तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरापासून या कार्यक्रमांची सुरुवात होत शोभायात्रा, मोटारसायकल रॅली, समाज बांधवांचा मेळावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
तरुणपिढीने वारसा जपला पाहिजे
जळगावात ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने आहे. यात तरुणांचा समावेशदेखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात तरुणपिढी भरकटत चालली की काय? अशी स्थिती आहे. त्यामुळे या पिढीला आपल्या समाजाचा गौरवशाली इतिहास सांगण्याची गरज आहे. तरुणांनीदेखील आपला समाज काय आहे? आपला गौरवशाली इतिहास लक्षात घेत आपला वारसा जपला पाहिजे. यासाठी शोभायात्रा यासारखे कार्यक्रम बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे घेतले जात आहे, असेदेखील श्रीकांत खटोड यांनी सांगितले. यासह भगवान परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम हा फक्त बहुभाषिक ब्राह्मण संघासाठी असतो. पण बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे घेण्यात येणारा आदी शंकराचार्य जयंती उत्सव हा सर्व हिंदू बांधवांसाठी घेण्यात येतो. या वर्षीदेखील आदी शंकराचार्य जयंती साजरी होणार असून, हा कार्यक्रम सर्व हिंदू बांधवांसाठी असतो. त्यामुळे सर्व हिंदू बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनदेखील खटोड यांनी केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांपासून ते आर्थिक मदत
पुढे बोलताना श्रीकांत खटोड म्हणाले, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नितीन पारगावकर यांनी गेल्या २-३ वर्षांपासून समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्य सुरू केले आहे. त्यानुसार आम्ही समाजातील गरजू विद्यार्थ्यांची निवड करत त्याला कशी मदत अपेक्षित आहे ते लक्षात घेत त्याला मदत करत आहोत. आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले आहे. तर गेल्या वर्षी १५ विद्यार्थ्यांना आर्थिक मदतदेखील आम्ही केली आहे. आगामी काळात बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्याची सुविधा मिळावी या दृष्टीने काम सुरू असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
महिलांचा मोठा सहभाग
भगवान परशुराम जयंतीसह समाजातील प्रत्येक कार्यात महिला मंडळाचा मोठा सहभाग असतो. समाजाचे हे कार्य पुढे नेण्यासाठी ४०० लोकांची सक्रिय टीम आहे. यात २०० महिलांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे या महिला नियोजन करण्यापासून ते शोभायात्रा पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावतात. समाजातील महिला मंडळ अतिशय अॅक्टीव असून त्यांच्या सहकायनिव हे कार्य यशस्वी होत आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठीदेखील बहुभाषिक ब्राह्मण संघ प्रामुख्याने कार्य करत आहे. यासाठी विशेष लक्ष देत समाजातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणे, शासनाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवित त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आगामी काळात मोठे काम केले जाणार आहे.
समाज मंगलकार्यालयासाठी प्रयत्न
समाजात असेही बांधव आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. मुला-मुर्तीच्या लग्नात मंगल कार्यालयाचा खर्च हा खूप मोठा असतो. ही समस्या लक्षात घेता शहरात समाजाचे एक सुसज्ज असे मंगल कार्यालय असावे, असा आमचा मानस असून, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. समाजाची वास्तू झाल्यास समाज बांधवांना अत्यल्प दरात त्याचा लाभ घेता येईल. त्या दृष्टीने प्रयत्न असल्याचेदेखील श्रीकांत खटोड यांनी सांगितले.
समाजाने एकत्र यावे
जवळपास ५० शाखांमध्ये ब्राह्मण समाज विखुरलेला आहे. हा समाज एकत्र आणण्याचं काम बहुभाषिक ब्राह्मण संघ करत आहे. सध्या मोठ्या संख्येने समाज एकत्र आला आहे. पण, अजूनही काही समाजबांधव बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपसातील हेवेदावे दूर सारत एकत्र यावे. कारण सध्या समाजासमोर काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात मुला-मुर्तीचे विवाहाचे प्रश्न, मुलांना लग्नासाठी मुली न मिळणे. जीवनसाथीबद्दल मुला-मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा, ब्राह्मण समाजातील मुलं सुसंस्कृत आहेत पण या संस्कारात अधिक वाढ करण्याची गरज आहे. कारण पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जात काही मुलं-मुली चुकीचे पाऊल उचलत आहेत. शैक्षणिक प्रश्न आहे. यासह लव्ह जिहादची समस्यादेखील समाजापुढे निर्माण झाली आहे. या सर्व समस्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येत भगवान परशुराम जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शेवटी श्रीकांत खटोड यांनी केले.
समाजाच्या एकतेचा मोठा परिणाम
समाज एकवटल्याने काय बदल झाले हे सांगताना श्रीकांत खटोड म्हणाले की, काही लोक चुकीचा इतिहास सांगून ब्राह्मण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. हा समाज संघटित नसल्याने, काहीही बोला, काहीच प्रतिक्रिया येत नाही, असा समज काहींचा झाला होता. मात्र, आता समाज एकत्र आला आहे. समाज एकत्र अल्याने, अशा प्रकारांना जवळपास ९० टक्के आळा बसला आहे.
सर्वांना एकत्र करणे मोठे आव्हान होते
मुलाखतीदरम्यान बहुभाषिक ब्राह्मण संघ स्थापन करण्यामागच्या उद्देशाबद्दल बोलताना श्रीकांत खटोड यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज हा खूप मोठा आहे. मात्र, हा समाज वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे या सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाची स्थापना करण्यात आली. या कार्याची सुरुवात करताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, कारण सर्वांना एकत्र आणणे हे मोठं आव्हान होतं आणि हे आव्हान आम्ही स्वीकारलं. सुरुवातीला सर्व समाज बांधवांची नावे, पत्ते आम्ही शोधून काढली. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन समाजाने एकत्र का आलं पाहिजे, याचं महत्त्व पटवून दिलं. सुरुवातीला ही प्रक्रिया खूप अवघड वाटायची. मात्र, सतत प्रयत्न करत राहिलो आणि त्याचे मूर्तीमंत रूप सध्या समाजाला दिसत असून, दरवर्षी भगवान परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने समाज बांधव एकत्र येत आहेत. सुरुवातीला आम्हाला समाज बांधवांना आवाहन करावं लागत होतं की, कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र या, पण गेल्या १० वर्षांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आता प्रत्येक समाज बांधव हा या उत्सवाची वाट पाहतो. यानिमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र येतो आणि विचारांची देवाण घेवाण होते.