तरुण भारत लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२२ । सध्या खुनाच्या घटना रोजच घडत असून यवतमाळ जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, या घटनेने अख्ख यवतमाळ हादरलं आहे. पिकांची राखण आणि कपाशीला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या ४९ वर्षीय शेतकऱ्याची रात्री शेतातील झाडाखाली झोपले असताना धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. सकाळी जेव्हा शेतकऱ्याची पत्नी नेहमीप्रमाणे शेतात गेली, तेव्हा पतीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून ती हादरुनच गेली. याप्रकरणी पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. नेमकी ही हत्या कुणी केली, का केली, याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
बबन वसंत राऊत (वय ४९) असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील काळी दौलत खान शिवारात हे हत्याकांड घडलं. राऊत हे नेहमीप्रमाणं आपल्या शेतात गेले होते. पिकांची राखण करण्यासाठी आणि कपाशीला पाणी देण्यासाठी ते शेतात गेले. रात्री ते शेतातच थांबले. शेतातील एका झाडाखाली ते झोपी गेले.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास बबन यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बबन यांचा मृत्यू झाला. रात्री घडलेल्या या घटनेनंतर ते सकाळपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. रविवारी रात्री हे हत्याकांड घडलं. सोमवारी सकाळी हत्येची ही घटना उघडकीस आली.
बबन यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेली. पण त्याआधी बबन यांच्या मुलाने त्यांना मोबाईल फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा फोन बंद होता. अखेर पत्नी शेतात गेल्यानंतर जे दिसलं, त्याने ती हादरुनच गेली.
त्यानंतर या घटनेची माहिती पुसद येथील ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. शेतीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या हत्याकांडानंतर मृत बबन यांचा सख्खा लहान भाऊ फरार आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. या हत्येशी बबन यांचा सख्खा लहान भाऊ शिवाजी राऊत यांचाही काही संबंध तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जातेय. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.