तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । एका १० वर्षांच्या मुलाने आईने हट्ट पूर्ण न केल्याने तिची गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना अमेरिकेत घडली आहे. संशयित मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
स्वत:हून गुन्ह्याची कबूली दिली
सदर घटना २१ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील मिलवॉकी येथे घडली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी मुलाला ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने चुकून गोळी लागल्याचे सांगितले. मात्र नंतर त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. तो मनोरुग्ण असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
आईचा मृत्यू झाल्याची त्याला जराही दु:ख झाले नाही
मुलाची मावशी आणि बहिण यांनी सांगितले की, त्याला वर्चुअल रियालिटी हेडसेट पाहिजे होता. यासाठी त्याने दोन दिवस आईकडे हट्ट केला. मात्र आईने हेडसेट देण्यास नकार दिल्याने त्याने तिच्यावर गोळी झाडली. आईचा मृत्यू झाला आता आई आपल्याला परत कधीच नाही दिसणार याचे त्याला जराही दु:ख झाले नाही. त्याने लगेच दुसऱ्या दिवशी आईच्या अमेझॉन अकाउंट वरून वर्चुअल रियालिटी हेडसेट ऑर्डर केला. तसेच त्याच दिवशी त्याने ७ वर्षीय चुलत भावावरही हल्ला केला, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
या घटनेत मुलाने आईच्या हत्येसाठी वापरलेली बंदूक आई कामात असताना गपचूप स्वत:कडे चोरून ठेवली होती. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कुटुंबीयांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे आईचे निधन झाले आहे तर दुसरीकडे मुलावर कारवाई आणि त्याचा मानसीक आजार याने कुटुंबीय त्रस्त आहेत. अशात लहान मुलांच्या वकील एंजेला कनिंघम यांनी १० वर्षाच्या मुलावर होणाऱ्या कारवाईवर मत देत हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.