‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत भरा अर्ज

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची माहिती दिली. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे बैठक पार पडली.

या बैठकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय या बैठकीत पात्रतेसंबंधीची अधिवास प्रमाणपत्राची अटही शिथिल करण्यात आली. जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्मदाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. यासोबतच ५ एकर शेतीची अट मागे घेण्यात आली आहे.

तसेच लाभार्थ्याच्या वयाची अट २१ ते ६० वरुन २१ ते ६५ करण्यात आली आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तसेच २.५ लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे.