आरटीईअंतर्गत अर्जासाठी मुदतवाढ ; जाणून घ्या कधीपर्यंत आहे अर्जाची मुदत

पुणे :  शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतगत  २५ टक्के राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्जाची मुदत मंगळवार ३० एप्रिल रोजी संपली आहे.  दरम्यान, अद्याप अर्ज न केलेल्या पालकांना १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मंगळवार, ३० एप्रिल पर्यंत राज्यभरातून केवळ ६१ हजार पालकांनी आरटीईसाठी अर्ज केले आहेत. राज्यभरात आरटीईच्या ८ लाख ८६ हजार ४११ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली. याकालावधीत फक्त ६१ हजार पालकांनीच अर्जनोंदणी केल्याची आकडेवारी आरटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या प्रक्रियेत जास्तीत जास्त अर्जनोंदणी व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता होती.  मुदतवाढ दिली तरी अपेक्षित अर्जनोंदणी होण्याची शक्यता कमीच आहे. यंदा शासनाने आरटीई कायद्यात बदल करत शासकीय आणि खासगी अशा सर्व शाळांमध्ये प्रवेशाची मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित, शासकीय यांसह खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाची तरतूद करण्यात आली. त्यामुळे अर्जनोंदणी वेगाने होणे अपेक्षित असताना पालकांनी आरटीईकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, १ लाख पालकांनी केवळ अर्जनोंदणी केली असून आपला अर्ज निश्चित केला नाही. जे पालक वेळेत अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांना १० मेपर्यंत अर्ज करता येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली