तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । एकाच वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाकडून वारंवार छेडछाडीच्या तत्रासाला कंटाळून एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही घटना ऑक्टोबर महिन्यात पुण्यात घडली होती. या प्रकरणातील संशयिताला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपी देकील अल्पवयीन आहे, त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी पुण्यातील केंद्रीय विद्यालयात १२ वीमध्ये शिकत होती. शाळेतून घरी ये-जा करत असताना एक १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलगा तिचा जुलैपासून पाठलाग करत होता. हा मुलगा तिला वाटेत अडवून मैत्री करण्याची जबरदस्ती करून तिला त्रास देत असे.
याच त्रासाला कंटाळून मुलीने १२ ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सकाळी ठरलेल्या वेळेपर्यंत ती दरवाजा उघडून बाहेर आली नाही, म्हणून घरच्यांना संशय आला. त्यांनी पाहिले तर दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली होती.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. दरम्यान, मुंढवा येथील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा तिचा पाठलाग करुन तिला मैत्री करण्यासाठी त्रास देत होता, असे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी अल्पवयीन मुलावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पाठक या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.