नेत्रदान पंधरवाड़ा

डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे. परंतु, काही व्यक्ती यापासून वंचित असतात. काही कारणास्तव त्यांना अंधत्व प्राप्त होते. त्यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत, सौंदर्याने भरलेली सृष्टी ज्यांना पाहता येत नाही. या व्यक्तींना नेत्र मिळाले, तर ते सृष्टीचा आस्वाद घेऊ शकतील.

सध्या दानाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयवदान, रक्तदान, नेत्रदान आदींना फार महत्त्व आहे. भारत सरकारने यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दृष्टिविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा 100 टक्के केंद्र सरकार पुरस्कृत असून, अनेक नेत्रपेढ्या, फिरती नेत्रपथके कार्यरत आहेत. नेत्रदानासाठी व्यक्तीच्या मृत्यूनंतर  दोन तासांच्या आत डोळे (बुबुळ) काढले पाहिजेत. ज्या लोकांना बुबुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे म्हणजेच कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे अशा अंध व्यक्तींना नेत्र रोपणाचा फायदा होतो. नेत्रदानानंतर केवळ डोळ्याच्या बुब्बुळाचे प्रत्यार्पण केले जाते. पूर्ण डोळा बदलला जात नाही.

अंधत्वाची कारणे 

डोळ्याला होणारी इजा उदा. बुब्बुळाला होणाऱ्या जखमा, असंरक्षितरित्या पेटविलेले फटाके, कुपोषणामुळे, इन्फेक्शन (जंतू प्रादुर्भाव) मुळे, देवी व्रण, इ. विकारामुळे, डोळयात काही केमिकल्स गेल्यास व अनुवंशिकता या कारणांमुळे अंधत्व येऊ शकते

नेत्रदान कोण करू शकतो?

नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते. बालकापासून वृध्दांपर्यंत कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. ज्यांना चष्मा आहे, ते सुध्दा नेत्रदान करू शकतात. ज्यांना ब्लडप्रेशर, डायबिटीस, दमा, इ. विकार असतील व मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली असेल अशा व्यक्ती सुध्दा नेत्रदान करू शकतात.

नेत्रदान कोण करू शकत नाही? 

एड्स, हिपेटेटिस (लिव्हरचे आजार), सेप्टिसिमिया (रक्तातील जंतू प्रादुर्भाव), ब्लड कॅन्सर, रेबीज इ. आजार झालेले रुग्ण नेत्रदान करु शकत नाहीत. नेत्रदानाच्या वेळी घ्यावयाची काळजी मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवले आहे. तेथील पंखा बंद करावा. त्याचे डोळे बंद करून डोळयावर ओला कापूस अथवा ओला रुमाल ठेवावा व डोक्याखाली जाड उशी ठेवावी. आपल्या डॉक्टरांकडून डेथ सर्टिफिकेट तयार ठेवावा. डोळ्यातील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासाच्या आत काढावे लागतात. जरी मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल, तरीही नातेवाईकांच्या इच्छेनुसार त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते.

मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे मानवतावादी कार्य 

नेत्रदानाचा फोन आल्याबरोबर नेत्रपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर त्वरित जाऊन रुग्णाचे बुबुळे काढून नेतात. नेत्रदानाने चेहरा विद्रूप होत नाही. जळगावात केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी आहे. नेत्रपेढीत तपासणी करून योग्य त्या रुग्णावर विनामूल्य प्रत्यारोपण करून दृष्टीदानाचे अनमोल कार्य करीत आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. नेत्रदानाची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येते. यात महत्त्वाची बाब ही की पूर्ण डोळा प्रत्यारोपित केला जात नाही तर केवळ बुबुळ प्रत्यारोपित करण्यात येते. नेत्रदानामुळे मृताच्या चेहऱ्यावर कुठेही विद्रूपता येत नाही.

कसे होते नेत्रदान?

नेत्रपेढीची भूमिका महत्त्वाची असते. नेत्रदात्याचे मरणोत्तर नेत्र संकलन करणे हे या पेढीचे प्रमुख कार्य, नेत्रदात्याची मरणोत्तर रक्ततपासणी एचआयव्ही व हिपेटायटिससाठी करण्यात येते. नेत्रदानाबाबत कॉल आल्यानंतर संबंधित नेत्रपेढीची तज्ज्ञ टीम त्वरित त्या ठिकाणी पोहोचते. यामुळे अंत्यविधीला कोणत्याही प्रकारचा विलंब होत नाही.

25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान नेत्रदान चळवळ पुन्हा प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. नेत्रदान केल्याने इतरांना दृष्टी मिळू शकते हे अगदी सत्य आहे. यासाठी या दिवसात नेत्रदान संकल्प फॉर्म नेत्रपेढीत भरण्याची मोहीम राबविण्यात येते. याच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावत आहेत.

डॉ.धर्मेंद्र पाटील (नेत्ररोगतज्ज्ञ), प्रकल्पप्रमुख, मांगीलालजी बाफना नेत्रपेढी, जळगाव

9423187486