सामाजिक सद्भावनेद्वारे आव्हानांचा सामना शक्य, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

---Advertisement---

 

सर्व भारतीय लोक आपापली आस्था आणि आचरणासह स‌द्भावनेने एकत्र नांदतात. अशा सामाजिक स‌द्भावनेद्वारे जीवनातील मोठ्या आव्हानांचाही सामना करणे शक्य होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

संघ शताब्दीनिमित्त रायपूर येथील श्रीराम मंदिरात सामाजिक सद्भावना बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला विविध जाती, समाज, पंथाचे शेकडो प्रतिनिधी हजर होते. त्यांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, भारतातील लोकांमध्ये सामाजिक सद्भावना हा स्थायी भाव आहे. भारतीय घरात काम करणाऱ्यालाही घरातील लहान मुले ‘काका’ म्हणातात, त्याला आदरार्थी संबोधून सन्मान दिला जातो. हा सद्भाव कित्येक दशकांपासून चालत आलेल्या परंपरेचा भाग बनला आहे.

सामाजिक एकता ही प्रचंड मोठी ताकत आहे. ब्रिटिश स्वेच्छेने भारत सोडून गेले नाहीत, आपल्या लोकांनी एकजूट होऊन स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. आपल्या या एकता आणि अखंडतेच्या काही धाग्यांना आपण विसरलोय्, त्यामुळे दृष्टिकोनात भेदाभेद आला. इंग्रजांना आपली एकता आवडली नाही, तर त्यांनी त्याचीही व्यवस्था केली. त्यांनी लोकांमध्ये कायम भेदाभेद राहील, अशी फूट पाडली. पण, आपण त्यांच्या या प्रयत्नांना देखील निष्फळ केले. जिथे सद्भावना मजबूत असते, तिथे फूट पाडणाऱ्यांची मात्रा चालत नाही.

लव्ह जिहाद, धर्मांतरणाबाबत प्रबोधन व्हावे

आज आपल्यासमोरही अनेक आव्हाने आहेत. प्रत्येक समाजाच्या स्वतःच्या काही आकांक्षा आहेत. आपण आजवर आपली विविधता सांभाळून अस्मितेचे रक्षण केले. आम्ही समाज आणि देश म्हणून एक आहोत, ज्याच्या मागे सामाजिक सद्भावनाच आहे. जे लोक या भावनेला सहन करू शकत नाहीत, ते आपल्या स‌द्भावनेवर आक्रमण करतात. पण, या स्थितीत आपल्याला एकत्र राहून सामना करायला हवा. हे समाजात सांगूनच जनजागृती करावी लागेल. लव्ह जिहाद, धर्मांतरण व्यसन आदीं संदर्भात प्रबोधन व्हायला हवे. माणूस एकाकी पडला की, त्याची एकटेपणाची भावना व्यसनाकडे ढकलते. यउलट, सामाजिक एकतेने सुरक्षिततेची भावना येते, असेही सरसंघचालक म्हणाले.

कुटुंबात प्रबोधन महत्त्वाचे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दीनिमित्त दिलेल्या पंचसूत्रीत कुटुंब प्रबोधनाचाही समावेश आहे. याविषयी सरसंघचालक म्हणाले की, घरात आपल्या कुटुंबाचे प्रबोधन व्हायला हवे. आठवड्यातून किमान एक दिवस ठरवून सर्व कुटुंबीयांनी एकत्र आले पाहिजे. भजन, भोजन एकत्र घेतले पाहिजे. नंतर सर्वांनी मिळून काही विषयांवर चर्चा करावी. असा मंगल संवाद कुटुंबात व्हायला हवा. यातूनच आपण समाजाला किती वेळ देऊ शकतो, याचाही विचार करावा, असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सुचविले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---