नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. त्यासोबतच लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आचारसंहितेत अडकून राहू नये म्हणून ऑक्टोबर महिन्यांतच दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. आता निवडणुका आणि आचारसंहिताही संपल्याने डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत जमा होण्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली होती. लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला.
आता योजनेच्या निकषात अधिक कोटेकोरपणे येणार आहे. तसेच आता १५०० रुपयांवरून २१०० रुपये दिले जाण्याची घोषणाही झाली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर आता २१०० रुपयांच्या हप्त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अधिवेशनात बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचे आभार मानतो की त्यांनी महायुतीला घवघवीत यश देत निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक है तो सेफ है या नाऱ्याला महाराष्ट्राने मोठा प्रतिसाद दिला. यातून मोठा विजय महाराष्ट्राला प्राप्त झाला. महायुती काळात सुरू झालेल्या सर्व योजना कायम राबविले जातील”, असे आश्वासनदेखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जनतेला आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच ज्या ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत, त्यातील एकही योजना बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन देखील फडणवीसांनी दिले. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यावर टाकणार असल्याचेही आश्वास फडणवीसांनी दिले.