फडणवीस यांनी पवार-ठाकरे यांना मोदींनी दिलेल्या ऑफरबाबत केला ‘हा’ खुलासा

पुणे : “मोदी यांनी कुठेलीही ऑफर दिली नव्हती. पवारसाहेबांचं आजपर्यंत तुम्ही राजकारण पहिले तर त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. पवार साहेबांचे असे वक्तव्य करण्याचा अर्थ ज्यांना इतिहास आहे त्यांना तो समजतो. हा संदर्भ मोदींचा होता त्यांनी कोणतीही ऑफर दिलेली नव्हती, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ते  पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत महाराष्ट्रातील दोन मोठे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आपल्यासोबत येण्याची थेट ऑफर दिली होती. मोदींच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, शरद पवारांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या खूपच जवळ येतील किंवा विलीन होतील, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोदींनी पवार-ठाकरेंना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली होती.

चारशे पारची घोषणा अडचणीत?

भाजपनं चारशे पारचा नारा दिला होता, पण आता तशी परिस्थिती दिसत नाही. या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “तुमच्या मनात ही निवडणूक आमच्यासाठी कठीण दिसतेय तशी आमच्या मनात ती नाही. आम्ही जशी अपेक्षित केली होती तशीच ती आमच्यासाठी आहे. तोच परफॉर्मन्स आमचा असणार आहे. पण हे खरं आहे की पवार साहेब, उद्धव ठाकरे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तर ३५ जागा महाविकास आघाडीला मिळतील असं सांगितलं. पण मी त्यांचे धन्यवाद मानतो की, त्यांनी किमान १५ जागातरी आमच्यासाठी सोडल्यात. हा जो काही नरेटिव्ह आहे तो सुपरफिशिअल आहे. तिन्ही पक्ष मिळून आमची निवडणूक व्यवस्थित चालू आहे, त्यामुळं अपेक्षित जागा आम्हाला मिळतील, असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला.