मुंबई : हा थापांचा नाही तर आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात अतिशय प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. विशेषत: शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित हा अर्थसंकल्प आहे. उद्धवजी म्हणाले की, हा थापांचा अर्थसंकल्प आहे. पण हा थापांचा नाही तर आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे.”
“विरोधी पक्षाचे लोक अर्थसंकल्पावर बोलत होते आणि आम्ही टीव्हीवर बघत होतो. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता आणि चेहरे उतरलेले होते. ते केवळ टीका करत होते. पण मला वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करणारा आहे. या अर्थसंकल्पात जे जे आम्ही कबुल केलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्यावेळेत पूर्ण करुन दाखवू. हा निवडणूकीचा अर्थसंकल्प नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही दाखवून देऊ,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.