धुळ्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्‌ध्वस्त, ८ जणांना अटक

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । धुळे तालुक्यातील कावठी शिवारातील बनावट देशी दारूचा कारखाना तालुका पोलिसांनी छापा टाकत उध्वस्त केला. यात तब्बल ९५ लाख 77 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांत 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळी पत्रकार परिषद घेवून आज सकाळी कारवाईची माहिती दिली. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी फागणे ते बाबुळवाडी रस्त्यावर एम एच 41 ए यु 21 24 क्रमांकाची ट्रक ताब्यात घेतली. या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये सोपान रवींद्र परदेशी हा युवक आढळून आला. त्याच्या चौकशीमध्ये या ट्रकमध्ये बनावट मद्याचे 100 बॉक्स आढळून आले. त्यानुसार प्राथमिक चौकशीच्या आधारावर मेहरगाव परिसरातील कावठी शिवारात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व महादेव गुट्टे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, मुकेश पवार, अविनाश दहिवड, नितीन दिवसे, अमोल कापसे, दीपक पाटील, नंदू चव्हाण, वसंत वाघ या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ओम साई फार्म हाऊस या शेडवर छापा टाकण्यात आला.

या छाप्यामध्ये भयानक प्रकार समोर आला. या शेडमध्ये बनावट मद्य पॅकिंग करण्यासाठी अत्याधुनिक मशीन बसवल्याची बाब निदर्शनास आली. घटनास्थळावरून पोलीस पथकाने सोपान रवींद्र परदेशी, शांतीलाल उत्तम मराठे, सागर बापू भोई, सुनील सुधाकर देवरे, ज्ञानेश्वर बाबूसिंग राजपूत, सचिन सुधाकर देवरे, नितीन रंगनाथ लोहार, तसेच सोपान परदेशी या सात जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.घटनास्थळावरच तपास पथकाला बक्षीस

या धडाकेबाज कारवाईनंतर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. घटनास्थळावरच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महिराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पथकाला हा रोख पुरस्कार देण्यात आला.