पत्र्यांच्या गोडाऊनमध्ये बनावट दारूचा कारखाना सुरु होता, अखेर.. टाकला छापा, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

पारोळा :  शहरातील नगरपरिषद हद्दीतील धुळे-नागपूर महामार्गालगत गट नं.१८१ मध्ये असलेल्या पत्र्यांच्या गोडाऊनमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने २४ डिसेंबर रोजी छापा टाकून बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उध्द्वस्त केला. त्यात १ कोटी ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील २२ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या विभागीय भरारी पथकाने पारोळा शहरातील नगरपरिषद हद्दीतील धुळे-नागपूर महामार्गालगत गट नं.१८१ मध्ये असलेल्या पत्र्यांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकला. त्यात स्पिरीट ५ हजार लि., अवैध बनावट मद्य द्रावण १७०० लि., देशी मद्य ९ हजार ४३२ लि., बुचे सील करण्याचे मशिन , देशी दारू ब्रॅडचे ४१ हजार २०० बुचे, देशी दारुसाठीचे २ लाख १५ हजार बनावट कागदी लेबल, २४ हजार रिकामाया बाटल्या, ९ मोबाईल, एक दहा चाकी टाटा कंपनीचा ट्रक, एक सहा चाकी आयशर कंपनीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध मद्य निर्मिती करणार्‍या २२ संशयित आरोपींवर कारवाई करण्यात आली. यात महेश पाटील रा.जवखेडे ता.अमळनेर, सुदामगिरी गोसावी रा.भाटपूर ता.शिरपूर, प्रेमसिंग जाधव रा.रोहणी ता.शिरपूर, नरेंद्र पाटील रा.गुढे ता.भडगाव, राजू जाधव धवली मध्यप्रदेश, प्रदीप पावरा मोहिदा ता.शिरपूर, दिपक पावरा रा.दुधखेडा मध्यप्रदेश, रंजित पावरा गधडदेव ता.शिरपूर, प्रताप पावरा मोहिदा शिरपूर, सतिश पावरा मोहिदा शिरपूर, प्रकाश पावरा मोहिदा शिरपूर, राकेश पावरा मोहिदा शिरपूर, दयाराम बारेला धवरला मध्यप्रदेश, रामसिंग गोसावी धवरला मध्यप्रदेश, भिमसिंग चव्हाण तांडा मध्यप्रदेश, सुरेश राठोड रोहिणी शिरपूर, निलेश पावरा मोहिदा शिरपूर यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य संशयित समाधान चौधरी पारोळा, सुधाकर पाटील , प्रदीप पवार, राहुल अहिरराव हे फरार आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण मुंबई, नाशिक उपायुक्त अर्जुन ओहोळ, जळगावचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस.चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही.एम.पाटील, अ.गो.सराफ, जवान सर्वश्री गोकूळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाई करीता निरीक्षक, भरारी पथक, जळगाव, सी.एच.पाटील व त्यांचा स्टाफ तसेच निरीक्षक, भरारी पथक धुळे दिंडकर व त्यांचा स्टॉफ तसेच दुय्यम निरीक्षक, धुळे ग्रामीण, धुळे पी.बी.अहिरराव व त्यांचा स्टाफ यांनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक-विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग ए.एस.चव्हाण हे करीत आहे.