जळगाव : शासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील आता सायबर ठगांपासून सुरक्षित राहिलेले नाही. ठगांचा धाडसीपणा इतका वाढला आहे की त्यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम इती पांडे यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्याचा प्रकार ४ जुलै रोजी उघड झाला होता. आता याच प्रकारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांचे नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप अकाउंट तयार केल्याचा प्रकार सोमवार, १५ जुलै रोजी उघड झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील हि दुसरी घटना आहे.
याबाबतचे वृत्त असे की, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या ९४७८२५६००६० या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्स ऍप द्वारे बनावट प्रोफाईल तयार करुन जिल्हा परिषदेशी सबंधित अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेज करत असलेचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे मेसेज करुन कोणाचीही दिशाभूल करण्याचा प्रकार झाल्यास तात्काळ संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल करावी व अशा मेसेजची दखल घेऊ नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी केले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांचे नावाचा व छायाचित्राचा वापर करून अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने बनावट प्रोफाईल तयार केले असून ९४७८२५६००६० या क्रमांकावरून जिल्हा परिषदेशी सलग्नीत काही अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेजेस प्राप्त झाले आहेत. संबंधित व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित असल्याचे दाखवत आहे. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन सबंधिताच्या कोणत्याही मेसेजला बळी न पडता असा प्रकार निदर्शनास येताच त्या अज्ञात मोबाईल धारकास कोणताही प्रतिसाद न देता तक्रार करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.