Gold rate । भारतात सोन्याला किती पसंती आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. विशेषतः स्त्रियांमध्ये सोन्याची खूप लोकप्रियता आहे. पण गेल्या काही दिवसांपासून दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. काही दिवसात लग्न साराईलाही सुरुवात होईल. अशातच जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाल्याने सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. दरम्यान, अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये पुन्हा उसळी दिसून आली. तर या आठवड्याची सुरुवातच पडझडीने झाली. या आठवड्यात सोन्यासोबतच चांदीत पण आपटी बार दिसला. यामुळे आगामी सणासुदीला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण
सोमवारनंतर मंगळवारी जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरात ७०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०,००० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदी दरातही तब्बल दोन हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ८० हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली.
अमेरिकेतील राजकीय घडामोडी, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल व डॉलरचे घसरत जाणारे दर यामुळे जगभरात चिंता वाढत आहे. सोमवारी (५ ऑगस्ट) जागतिक पातळीवर शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर एमसीएक्सवर सोने- चांदीचे भाव गडगडले होते. मात्र, प्रत्यक्ष सुवर्ण बाजारामध्ये सोने भाव केवळ १०० रुपयांनी, तर चांदीचे भाव २०० रुपयांनी कमी झाले होते. त्यामुळे सोने ७० हजार ७००, तर चांदी ८३ हजार ३०० रुपयांवर आली होती त्यानंतर मात्र मंगळवारी (६ ऑगस्ट) सोन्याचे भाव ७०० रुपयांनी तर चांदीमध्ये थेट दोन हजार ५०० रुपयांची घसरण झाली.
चांदी तीन महिन्यांच्या निचांकावर
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याची घोषणा झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव घसरत गेले. त्यानंतर ते काहीसे वाढत असताना पुन्हा आता मोठी घसरण झाली आहे. एकाच दिवसात चांदीमध्ये झालेली दोन हजार ५०० रुपयांची घसरण चांदीला तीन महिन्यांच्या नीचांकावर घेऊन आली आहे. यापूर्वी ४ मे रोजी चांदी ८० हजार ८०० रुपये प्रति किलोवर होती. त्यानंतर तिचे भाव वाढत गेले व चांदीने नवनवीन उच्चांक गाठले होते. मात्र, आता पुन्हा एकदा चांदीचे भाव ८० हजार ८०० रुपयांवर आले आहेत.