पुणे : शहरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची क्रूरपणे हत्या केली आहे.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास खराडी भागात हि घटना घडली आहे. ज्योती शिवदास गिते असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे. ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात बुधवारी पहाटेही असेच वाद झाले.
हेही वाचा : Bird flu: चिकन खात असला तर सावधान ! या जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा कहर
त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेदरम्यान झालेल्या आरडाओरडामुळे शेजारी जागे झाले. शेजाऱ्यांनी चौकशी केली, तोपर्यंत घटना घडली होती. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच ज्योती हिने अखेरचा श्वास घेतला तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक कलह हे या हत्येमागचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेमुळे खराडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.