जळगाव : नैराश्यातून ४३ वर्षीय शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. १) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. राजेश बन्सीलाल फुलपगारे, असे मृत शिक्षकाचे नाव आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, सौखेडा (ता. जळगाव) शिवारातील विवेकानंद प्रतिष्ठानच्या मूकबधीर विद्यालयात राजेश बन्सीलाल फुलपगारे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
शहरातील वाघनगर-जिजाऊनगरात शिक्षक राजेश बन्सीलाल फुलपगारे हे त्यांची पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून मालेगाव येथे विभक्त राहत असल्याने ते घरी एकटेच राहत होते. कौटुंबीक वादातून गेल्या काही महिन्यांपासून फुलपगारे प्रचंड नैराश्येत होते. दरम्यान, गेल्या रविवार (ता. २५) पासून शाळांना नाताळाच्या सुट्ट्या असून, फुलपगारे सर घरीच होते. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर घराबाहेर आलेच नाही, म्हणून त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना शंका आली. राजेश फुलपगारे घरातून बाहेर येत नाहीत.
त्यामुळे शेजाऱ्यांनी कुतूहलातून त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांना राजेश यांनी आतून दरवाजा बंद करून गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना देण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार अनिल फेगडे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृत फुलपगारे यांनी साधारण दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यांचा मृतदेह कुजण्याची प्रक्रिया नुकतीच सुरवात झाली होती. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.